पहिल्या दिवशी १२९१ विद्यार्थ्यांना दिला ऑनलाइन पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:27+5:302021-08-12T04:29:27+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रामधील अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विविध बारा अभ्यासक्रमांच्या ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रामधील अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विविध बारा अभ्यासक्रमांच्या एकूण १२९१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पेपर दिला.
बी. कॉम. आयटी., बँक मॅनेजमेंट, बी. एस्सी बायोटेक, आयटी., शुगर टेक, ॲनिमेशन, फॉरेन्सिक सायन्स, फूड प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग, बीसीएस अथवा बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ इंटेरिअर डिझायनिंग, ड्रेस मेकिंग अँड फॅशन को-ऑर्डिनेशन, बी. ए. मल्टिमीडिया या अभ्यासक्रमांच्या परीक्षा मंगळवारी सकाळी साडेदहा, दुपारी साडेबारा, अडीच आणि साडेचार या सत्रांमध्ये ऑनलाइन पद्धतीने झाल्या. या परीक्षेसाठी एकूण १३९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२१९ जणांनी परीक्षा दिली. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रातील एकूण ४३८ अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी एकूण १ लाख २० हजार ७४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व परीक्षांची वेळापत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास ती सोडविण्यासाठी यंत्रणा कार्यन्वित केली असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.
चौकट
कॅमेरा सुरू राहिल्यास ‘नेटवर्क’ची अडचण
या ऑनलाइन परीक्षेवेळी वेबकॅम सुरू ठेवण्याची सूचना विद्यापीठाने केली आहे. मात्र, जिल्ह्यातील दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी मिळते. त्यात कॅमेरा सुरू राहिल्यास नेटवर्कची अडचण येते. त्याचा विचार विद्यापीठाने करावा. विद्यापीठाच्या सर्व्हरवर एकाच वेळी परीक्षार्थी छायाचित्रे अपलोड करणार त्यामुळे सर्व्हर डाऊनची अडचण निर्माण होऊ शकते. विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या परीक्षांवेळी या स्वरूपातील तांत्रिक अडचण येऊ शकते. त्याचा विचार करून विद्यापीठाने कार्यवाही करण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
चौकट
मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचा प्रारंभ
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या परीक्षा मंगळवारपासून ऑनलाइन सुरू झाल्या. सकाळी आठ ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते रात्री आठ या दोन सत्रांत परीक्षा झाल्या. कोल्हापूर विभागीय केंद्राअंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३९५८६ नियमित आणि पुनर्परीक्षार्थींनी नोंदणी केली असल्याची माहिती या केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. आर. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.