ऑनलाईन पेपर : पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 07:47 PM2021-05-03T19:47:24+5:302021-05-03T19:49:19+5:30
CoronaVIrus EducationSector Exam Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या. त्यासाठी एमसीक्यू स्वरूपातील २५ प्रश्नांचा ऑनलाईन पेपर होता. या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना दि. १५ मेपर्यंतची मुदत दिली आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांमधील विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या. त्यासाठी एमसीक्यू स्वरूपातील २५ प्रश्नांचा ऑनलाईन पेपर होता. या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांना दि. १५ मेपर्यंतची मुदत दिली आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २७६ महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाने या महाविद्यालयांवर पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याची जबाबदारी सोपविली आहे. विद्यापीठाच्या सूचनांनुसार बहुतांश महाविद्यालयांनी सोमवारपासून या परीक्षांची सुरुवात केली. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत प्रत्येकी एक तासाच्या विविध सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून स्मार्टफोन, लॅॅपटॉप, टॅॅब, संगणक यापैकी एका माध्यमाचा वापर करून ऑनलाईन परीक्षा दिली. प्रथम वर्षाच्या परीक्षांच्या नियोजनासाठी महाविद्यालयांनी त्यांच्या पातळीवर परीक्षा समिती गठित केली आहे. त्यामध्ये प्रत्येक विद्याशाखेतील एका प्राध्यापकांचा समावेश केला आहे. या समितीसह दोन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.
एक-दोन विद्याशाखा असणाऱ्या काही महाविद्यालयांनी बुधवार (दि. ५) पासून परीक्षांची सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. त्यातील काही महाविद्यालयांमध्ये सोमवारी विद्यार्थ्यांची मॉक टेस्ट घेण्यात आली. दरम्यान, विद्यापीठाने विविध २५ अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील परीक्षा सोमवारी घेतली. त्यासाठी २९४३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८८१७ जणांनी ऑनलाईन परीक्षा दिली. या परीक्षेला ६२१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.