जिल्हा बँकांत यापुढे ऑनलाइन नोकरभरती, सहकार विभागाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:08 PM2022-06-24T17:08:56+5:302022-06-24T17:09:53+5:30
चतुर्थ श्रेणीतील शिपाई, वाहनचालक व सुरक्षारक्षक हीच पदे फक्त बँकेला स्वत:च्या अधिकारात भरता येणार आहेत.
विश्वास पाटील
कोल्हापूर : राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये यापुढे कर्मचाऱ्यांची भरती फक्त संगणकीय ऑनलाईन पद्धतीनेच घ्यावी लागणार आहे. त्यासाठी बँकेला त्रयस्थ खासगी संस्थेची नियुक्ती करण्याची मुभा देण्यात आली आहे. सहकार विभागाने गुरुवारी (दि २३ जून) ऑफलाईन नोकर भरतीला चाप लावणारा आदेश काढला आहे.
भरतीबाबत शासनाने यापूर्वीच २०१८ मध्ये आदेश काढला होता त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. राज्यभरातील बँकांमध्ये नोकर भरती करताना ऑफलाईन परिक्षेमध्ये परिक्षा झाल्यानंतर गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. उत्तरपत्रिका, गुणपत्रिकामध्ये बाह्य हस्तक्षेप झाल्याचे लक्षात आल्याने ऑफलाईन परिक्षा बंदच करण्यात आली आहे. या बँकांतील भरतीसाठी नाबार्डच्या राज्यस्तरीय कार्यबलाने कांही निकष निश्चित करून दिले आहेत. त्यानुसार बँकांचे आर्थिक उलाढालीनुसार अ,ब,व क असे वर्गीकरण करण्यात आले असून त्या प्रत्येक बँकांसाठी स्टाफिंग पॅटर्न निश्चित करून दिला आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करून सहकार आयुक्तांकडे मंजूरीसाठी पाठवावा लागतो व त्यांनी मंजूरी दिल्यावरच भरतीला परवानगी दिली जाते.
या बँकांतील भरतीत मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होतो, किंबहुना संचालकांना वाटते त्यास उमेदवारास नोकरी दिली जाते. त्यातून पूर्ण प्रशिक्षित मनुष्यबळ निवडले जात नाही. आता बँकिंग क्षेत्रासमोरील आव्हानेही वाढली आहेत. रिझर्व्ह व नाबार्डचेही रोज नवनवीन नियम लागू केले जात आहेत. कमी कर्मचाऱ्यांवर उत्तम सेवा देण्याचेही आव्हान आहे. त्यासाठी चांगले मनुष्यबळ निवडले जाण्याची गरज होती. हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून नवीन आदेश काढण्यात आल्याचे या बँकांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ऑनलाईन भरतीने कोणती पदे भरता येणार..
- अ प्रवर्गातील बँकासाठीची २५ पदे
- ब प्रवर्गातील बँकासाठीची २१ पदे
- क प्रवर्गातील बँकासाठीची १८ पदे
- ड प्रवर्गातील बँकासाठीची १५ पदे
चतुर्थ श्रेणीतील शिपाई, वाहनचालक व सुरक्षारक्षक हीच पदे फक्त बँकेला स्वत:च्या अधिकारात भरता येणार आहेत.
- राज्यातील एकूण मध्यवर्ती सहकारी बँका - ३१
- आर्थिक स्थिती अडचणीत असलेल्या बँका : १३
- जास्त अडचणीत असलेल्या बँका : ०३ (नागपूर, बुलडाणा व वर्धा)
संगणकीय ऑनलाईन भरतीमुळे चांगल्या लोकांची भरती होणे सुलभ होईल. भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पारदर्शकता येऊ शकेल. - अतूल दिघे, बँक एम्प्लाॉईज असोसिएशन कोल्हापूर.