ऑनलाईन शाळा ही शिक्षण प्रणाली राज्यभर राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:33+5:302021-08-23T04:26:33+5:30
म्हाकवे : ऑनलाईन शाळा ही देशातील पहिली महत्त्वाकांक्षी शिक्षण प्रणाली आहे. आता ही शिक्षण प्रणाली राज्यभरात राबविणार असल्याची घोषणा ...
म्हाकवे : ऑनलाईन शाळा ही देशातील पहिली महत्त्वाकांक्षी शिक्षण प्रणाली आहे. आता ही शिक्षण प्रणाली राज्यभरात राबविणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. प्रभावी असणारी ही शिक्षण प्रणाली कोरोनानंतरही सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
बानगे (ता. कागल) येथे ऑनलाईन शाळा व्हर्च्युअल अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती रमेश तोडकर होते.
कोरोनामुळे शिक्षणावर अंधकारमय ढग निर्माण झाले. परंतु, आता ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे प्राथमिक शिक्षणही एक पाऊल पुढे टाकत आहे. वाड्या-वस्त्यांवरही हे शिक्षण पोहोचविण्यासाठी सोलर किटची निर्मिती केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी ऑनलाईन शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणारे तंत्रस्नेही संदीप गुंड (नगर) यांचा सत्कार झाला. तसेच, इंटरनेट व वीज नसतानाही सौरऊर्जेवर चालणारे नावीन्यपूर्ण सोलर किट गुंड यांनी विकसित केले आहे. हे किट बोळावीवाडी येथील वि.मं. शाळेला दिले.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर यांनी केले. वसंत जाधव, रमेश सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गटविकास अधिकारी सुशील संसारे, महिला व बालकल्याण सभापती शिवानी भोसले, उपसभापती मनीषा सावंत, विकास पाटील, रवींद्र पाटील, जयदीप पोवार, सरपंच वंदना सावंत, जी. एस. पाटील, राहुल पाटील, दत्ता सावंत, विकास सावंत, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. गजानन गुंडाळे यांनी आभार मानले.
चौकट
मुश्रीफ यांनी जपला शाहूंचा शैक्षणिक वारसा : चव्हाण
बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी १०० वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. त्यानंतर आता कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीत प्राथमिक शाळेत शिकणारी मुले मागे राहू नयेत यासाठी मंत्री मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळेच आज या ऑनलाईन प्रकल्पाला मृत स्वरूप आले. मंत्री मुश्रीफ हे छत्रपती शाहूंचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा जपणारे नेते आहेत, असे गौरवोद्गारही चव्हाण यांनी काढले
बानगे येथील केंद्रशाळेत ऑनलाईन शाळा व्हर्च्युअल अकॅडमीच्या लेक्चर कॅप्चर स्टुडिओचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी सीईओ संजयसिंह चव्हाण, संदीप गुंड, जी. बी. कमळकर, आदी उपस्थित होते.