केएमटीच्या केवळ ११ च बस मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:20+5:302021-06-09T04:29:20+5:30
कोल्हापूर : महापालिका केएमटीच्या केवळ ११ च बस सोमवारी प्रवाशांच्या सेवेत राहिल्या. या बसनाही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, ...
कोल्हापूर : महापालिका केएमटीच्या केवळ ११ च बस सोमवारी प्रवाशांच्या सेवेत राहिल्या. या बसनाही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, शाळा सुरू झाल्यानंतरच पूर्ण क्षमतेने केएमटी बस सेवा शहरांतर्गत सुरू राहणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे प्रवासी वाहतूक सेवा बंद राहिल्याने दोन महिन्यांत केएमटीला तब्बल साडेचार कोटींचा फटका बसला आहे.
कोरोनामुळे प्रशासनाने विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीवरही मर्यादा आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून केएमटी बस सेवा बंद राहिली. सरकार आता लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करीत आहे. यामुळेच सोमवारी पहिल्याच दिवशी केएमटीच्या ११ बस विविध मार्गांवरून धावल्या. प्रामुख्याने आर.के.नगर, पाचगाव, कळंबा, साने गुरुजी वसाहत, कसबा बावडा, मार्केट यार्ड, पेठवडगाव, गोकुळ शिरगाव एमआयडीसी, कागल आदी भागात दिवसभर बस धावल्या. पन्नास टक्केच आसन क्षमतेची अट असल्याने केएमटीला पहिल्या दिवशी अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे उर्वरित बस सुरू करण्याला ब्रेक लावण्यात आला आहे. शाळा सुरू झाल्यानंतरच पूर्ण क्षमतेने सर्व मार्गांवर केएमटी बस धावणार आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे केएमटीला झालेला मोठा तोटा भरून काढणेही आव्हानात्मक बनले आहे.
कोट
सोमवारी दिवसभर केएमटीच्या ११ बस विविध मार्गांवरून धावल्या; पण अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. म्हणून शाळा सुरू झाल्यानंतरच थांबून असलेल्या बस मार्गस्थ होतील.
-पी. एन. गुरव,
वाहतूक निरीक्षक, केएमटी