जिल्ह्यात ऑक्सिजनचा केवळ २० टनांचाच राखीव साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:23 AM2021-04-19T04:23:18+5:302021-04-19T04:23:18+5:30

कोल्हापूर : कोविड लस, रेमडेसिविर इंजेक्शन पाठोपाठ देशभर ऑक्सिजनची देखील टंचाई तीव्र होत चालली आहे. कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा ...

Only 20 tons of reserves of oxygen in the district | जिल्ह्यात ऑक्सिजनचा केवळ २० टनांचाच राखीव साठा

जिल्ह्यात ऑक्सिजनचा केवळ २० टनांचाच राखीव साठा

Next

कोल्हापूर : कोविड लस, रेमडेसिविर इंजेक्शन पाठोपाठ देशभर ऑक्सिजनची देखील टंचाई तीव्र होत चालली आहे. कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणीही झपकन वाढली आहे. जिल्ह्यातील ७१ सेंटरवर ८११ रुग्ण ऑक्सिजनवर असून त्यांना आता २७ टन ऑक्सिजन खर्च झाला आहे. रुग्ण वाढल्याने आज सोमवारी हीच मागणी ३२ टनांवर जाऊ शकते. तथापि कोल्हापुरात सध्या केवळ २० टनांचाच ऑक्सिजनचा राखीव साठा आहे. त्यामुळे तातडीने राखीव साठा वाढवला नाही तर ऑक्सिजनसाठी धावाधाव करण्याची वेळ येणार आहे.

कोरोना रुग्णासाठी एचआरसीटी स्कोअर कमी झाला की तातडीने ऑक्सिजनची गरज भासते. ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरून सध्या सर्वत्र हाहाकार सुरू आहे, या तुलनेत कोल्हापुरात मात्र अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे; पण बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्याने कोरोना लागण हाेणाऱ्या रुग्णांची संख्या अडीचपट झाल्याने आहे, त्या व्यवस्थेवर ताण येत आहे.

कोल्हापुरात सीपीआर, आयजीएमसह ७१ ठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. या बेडवर सध्या ८११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी ही संख्या ७८६ इतकी होती, त्याआधी शुक्रवारी ५३२ होती. ऑक्सिजनची गरज लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दररोज ५० ते १०० जणांची भर पडत आहे. त्यामुळे आहे तो ऑक्सिजन पुरवणे अवघड झाले आहे. ऐनवेळी मागणी वाढली तर पुरवठा करताना यंत्रणांची तारांबळ उडू लागली आहे.

चौकट ०१

राखीव साठ्यासाठी हालचाली गतिमान

यासंदर्भात ऑक्सिजन कक्षाचे डॉ. उत्तम मदने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ऑक्सिजन सध्या पुरेसा आहे; पण रुग्णवाढीचा वेग पाहता तो कमी पडणार असल्याने अतिरिक्त साठा करण्याची गरज ओळखून त्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हा प्रशासन दक्ष झाले असून जिल्ह्यातील सहा अधिकृत एजन्सीकडून पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

Web Title: Only 20 tons of reserves of oxygen in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.