‘चिकोत्रा’ धरणात अवघे २२ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:49 PM2018-07-16T23:49:20+5:302018-07-16T23:49:28+5:30

Only 22 percent water in Chikotra dam | ‘चिकोत्रा’ धरणात अवघे २२ टक्के पाणी

‘चिकोत्रा’ धरणात अवघे २२ टक्के पाणी

googlenewsNext

दत्ता पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांसह शेतीची तहान भागविण्यासाठी १८ वर्षांपूर्वी चिकोत्रा नदीवर बांधण्यात आलेले झुलपेवाडी धरण केवळ दोन वेळाच पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे धरण भरल्यानंतर जादा होणारे पाणी बाहेर जाण्यासाठी बांधण्यात आलेला सांडवा (ओव्हरफ्लो गेट) पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला पाहायला मिळतो. तब्बल बारा वर्षांपासून धरणातील पाणी या गेटपर्यंत पोहोचलेलेच नाही. त्यामुळे यंदा तरी हे धरण ओव्हरफ्लो होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या धरणात अवघे २२ टक्के म्हणजेच ३२९ एमसीएफटी पाणीसाठा झाला आहे, तर धरणाच्या पुढे चिकोत्रा नदी काटोकाट वाहत आहे. हा विरोधाभास सहजतेने जाणवतो.
चिकोत्रा खोºयातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने कागल तालुक्याच्या दक्षिणेकडे आजरा तालुक्याच्या हद्दीत झुलपेवाडी येथे चिकोत्रा (झुलपेवाडी) धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची २००५ व २००७ ही दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही.
यावर्षीही पावसाचे पडणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाहूनच जात आहे. सध्या चिकोत्रा नदी दुथडी वाहत आहे. मात्र, धरणातील पाणीसाठ्याची पातळी अत्यंत संथगतीने वाढत आहे.
जिल्ह्यातील सर्व लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत, तर मोठी धरणे ५० टक्क्यांहून अधिक भरली आहेत; परंतु चिकोत्रा धरण केवळ २२ टक्क्यांवरच आले आहे. हा महिनाच हक्काचा पाऊस असतो. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान करणे आवश्यक आहे. धरणक्षेत्रातून वाया जाणारे पाणी या धरणात वळविण्याची गरज आहे.
चिकोत्रा खोºयात आजरा, भुदरगडसह कागलमधील ३५ गावांचा समावेश आहे. या धरणाची क्षमता अवघी दीड टीमसी इतकीच आहे. जर हे पूर्ण क्षमतेने भरले तर ३५ गावांच्या पिण्यासह ५ हजार ६२० एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे; परंतु दुर्दैव म्हणजे हे धरण भरतच नाही.
दरम्यान, धरणक्षेत्रात गेल्या २४ तासांत १३४ मि.मी. पाऊस पडला असून, आजअखेर ९०८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या सुरुवातीला धरणात १८० एमसीएफटी पाणी शिल्लक होते, तर आता ३२९ एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. म्हणजेच काळम्मावाडी धरणातून दूधगंगेत एकावेळी सोडल्या जाणाºया पाण्याचा निम्माही हा पाणीसाठा नाही. काळम्मावाडीतून एकाचवेळी साधारणत: ५०० एमसीएफटीहून अधिक पाणी नदीपात्रात सोडले जाते.
...तर आंदोलनाची तीव्रता वाढणार
गेल्या दोन महिन्यांपासून किसान सभेच्या माध्यमातून हे धरण पूर्ण क्षमतेने भरावे तसेच नागणवाडी प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी विशेष लक्ष देण्याचे अभिवचन दिल्यामुळे हे आंदोलन थांबले आहे; परंतु दिवाळीपर्यंत याबाबत हालचाली न झाल्यास पुन्हा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याशिवाय येथील जनतेला पर्यायच नाही.
पाण्याचा संपर्क नसणारे एकमेव सांडवा गेट..!
धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी जाण्यासाठी या धरणाच्या दक्षिण बाजूला वक्राकार सांडवा गेट आहे. मात्र, गेल्या बारा वर्षांपासून या गेटपर्यंत पाणीच न गेल्याने हे गेट उघडलेले नाही. या गेटची उघडझाप होत नसल्यामुळे त्याच्यावर गंज चढत आहे. १८ वर्षांत केवळ दोन वेळाच उघडले जाणारे हे एकमेव गेट आहे.

Web Title: Only 22 percent water in Chikotra dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.