२२ जागा द्याल तरच आघाडी

By admin | Published: January 30, 2017 12:55 AM2017-01-30T00:55:00+5:302017-01-30T00:55:00+5:30

जिल्हा परिषद निवडणूक : स्वाभिमानीचा भाजपपुढे प्रस्ताव; विश्वासात न घेतल्याचा आरोप; आज पुन्हा चर्चा

Only 22 points if you take space | २२ जागा द्याल तरच आघाडी

२२ जागा द्याल तरच आघाडी

Next



कोल्हापूर : गेले पंधरा दिवस राजू शेट्टी हे ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते आता दुसऱ्यांच्या पालख्या उचलणार नाहीत, असे सांगत आहेत. मात्र, रविवारी स्वाभिमानी आणि भाजप या दोन्ही पक्षांतील कोंडी फुटली आणि जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली. स्वाभिमानीने जिल्हा परिषदेच्या २२ जागा मिळाल्या तरच आघाडी करू असा प्रस्ताव भाजपपुढे ठेवला आहे.
रविवारी ‘भाजप-स्वाभिमानी’ची चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाली या चर्चेत आमच्याशी युती करायची म्हणता तर केवळ शिरोळपुरता विषय काढू नका, आम्हाला विश्वासात न घेता हातकणंगलेतील जागा जाहीर कशा करता, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते आमदार सुरेश हाळवणकर आणि जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांना विचारला. आघाडीसंदर्भात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व खासदार राजू शेट्टी यांची आज, सोमवारी भेट होण्याची शक्यता आहे.
‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्या निवासस्थानी आमदार हाळवणकर, शेळके, सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, श्रीवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली. यावेळी परस्पर नावे जाहीर करण्याबाबत सुरुवातीलाच विचारणा करण्यात आली. चर्चेत शिरोळचा मुद्दा केंद्रस्थानी राहिल्यानंतर बाकीच्याही तालुक्यांत ‘स्वाभिमानी’ची ताकद आहे. त्यामुळे तिथलाही विषय निघाला. हातकणंगलेत संघटनेला जागा हव्यात, असे यावेळी ठासून सांगण्यात आले. तुम्हाला जिल्ह्यात कुठे आणि किती जागा पाहिजेत याची एक अंतिम यादी द्या, असे हाळवणकर यांनी यावेळी चर्चेत सांगितले. त्यानुसार खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ‘स्वाभिमानी’च्या जिल्हा कार्यालयात रात्री बैठक घेण्यात आली. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे, मादनाईक, राजेंद्र गड्ड्याण्णावर यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिरोळच्या पाचही जागा ‘स्वाभिमानी’ला देण्याची तयारी
खासदार राजू शेट्टी यांच्याशी माझी फोनवरून चर्चा झाली. त्यानुसार दोन्ही पक्षांचे पदाधिकारी बसून चर्चा करण्याचे ठरले. त्यानुसार एक बैठक झाली आहे. आम्ही निवडणुकीच्या नियोजनात खूप पुढे गेलो आहोत. त्यामुळे आता पहिली यादी जाहीर करण्याची वेळ आली असताना ‘स्वाभिमानी’सोबत चर्चा सुरू झाली आहे. शिरोळमधील आठपैकी पाच जागा ‘स्वाभिमानी’ला देण्याची आमची तयारी आहे. उर्वरित दोन ठिकाणी आमचे उमेदवार व एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल. इतक्या स्पष्टपणे आमची चर्चेची तयारी आहे. मी सकारात्मक आहे. ‘स्वाभिमानी’सोबतची आमची चर्चा यशस्वी होईल, असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Web Title: Only 22 points if you take space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.