केवळ २७ व ५१ टक्के मतदान
By admin | Published: June 21, 2014 12:38 AM2014-06-21T00:38:06+5:302014-06-21T00:43:09+5:30
जेमतेम मतदान : पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक
कोल्हापूर : विधान परिषदेच्या आज, शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघात २७ टक्के तर शिक्षक मतदारसंघात ५१ टक्के मतदान झाले. मतदारयादीतील घोळामुळे दोन्ही मतदारसंघांत कमी मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मतदारयादीतून नावे गहाळ झाल्याने मतदारांमधून जिल्हा प्रशासनाविरुद्ध यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आज सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदारयादीत नावांचा घोळ झाल्याने मतदारांना मोठी पायपीट व धावपळ करावी लागली. त्याच्या परिणाम मतदानाची टक्केवारी घसरण्यावर झाली. पदवीधर मतदारसंघातील १ लाख २० हजार ८१३ मतदारांपैकी ३३ हजार १५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर शिक्षक मतदारसंघात ९६६२ मतदारांपैकी ६४०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणाऱ्या पुरुष शिक्षकांची संख्या ५२२० तर महिला शिक्षकांची संख्या ११८५ इतकी आहे.
मतदारयादीवर अनेक मतदार, उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सायंकाळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आपल्याकडे भारतीय जनता पक्षाची एक तक्रार आली आहे. मतदारयादीतील अनेक नावे गायब असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परंतु कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली त्यावेळी आम्ही हरकती मागविल्या होत्या. ज्यांनी हरकती घेतल्या त्यांच्या नावांच्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे यादीबाबत ज्या काही तक्रारी आहेत त्या पुराव्यासह दिल्यास त्याची चौकशी करता येईल.
दरम्यान, मतदानानंतर मतपेट्या रात्री शासकीय गोदामात आणण्यात आल्या. तेथून त्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात पुण्याला रात्री उशिरा नेण्यात आल्या. पन्हाळ्याचे प्रांत रवींद्र खाडे व करवीरचे प्रांत प्रशांत पाटील हे पोलीस बंदोबस्तात या मतपेट्या घेऊन पुण्याकडे रवाना झाले. २४ जूनला मतमोजणी होणार आहे.
पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील (भाजप), सारंग पाटील (राष्ट्रवादी), प्रा. शरद पाटील हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आपले राजकीय भविष्य आजमावून पाहात आहेत तर शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार भगवानराव साळोखे (भाजप-सेनाप्रणित), प्रा. दशरथ सगरे, गणपत तावरे (टीडीएफ), मानसिंग जगताप, प्रा. मोहन राजमाने, प्रतापसिंह देसाई आदी मान्यवर उमेदवार निवडणूक लढवत आहेत. (प्रतिनिधी)