जिल्ह्यात केवळ २८८ रुग्ण कोरोनामुक्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:01 AM2020-12-05T05:01:32+5:302020-12-05T05:01:32+5:30
कोल्हापूर : प्रतिबंधात्मक लस केव्हा यायची तेव्हा येवो; कोल्हापुरातून मात्र कोरोनाचा संसर्ग लसीशिवाय हद्दपार होऊ लागला आहे. शुक्रवारी केवळ ...
कोल्हापूर : प्रतिबंधात्मक लस केव्हा यायची तेव्हा येवो; कोल्हापुरातून मात्र कोरोनाचा संसर्ग लसीशिवाय हद्दपार होऊ लागला आहे. शुक्रवारी केवळ नवीन २२ कोरोना रुग्णांची नोंद झाली; तर ४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ २८८ रुग्ण कोरोनामुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला होता. रुग्णांना ठेवायला रुग्णालये अपुरी पडली. अनेकांना उपचार मिळाले नाहीत. शेवटी स्वत:च्या घरातच अलगीकरणात राहून डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचार घ्यावे लागले होते, एवढी भयानक परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली होती.
कोरोना प्रतिबंधक लस केव्हा येणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आता ही लस केव्हा यायची तेव्हा येवो; कोल्हापूरकर मात्र लसीशिवाय कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. जिल्ह्यात आता केवळ २८८ रुग्ण उपचार घेत असल्याने तेही लवकरच कोरोनामुक्त होतील, अशी अपेक्षा आहे.
सध्या २८८ पैकी १६० रुग्ण तर स्वत:च्या घरातच उपचार घेत आहेत. १२८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मानगुटीवरील कोरोनाचे भूत पूर्णपणे उतरले आहे. जिल्ह्यात सगळीकडे भयमुक्त वातावरण असले तरी नागरिक पुन्हा संसर्ग वाढू नये म्हणून पुरेशी काळजी घेत आहेत. दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने सगळेच दक्ष आहेत.
शुक्रवारी कोल्हापूर शहरात सहा, शिरोळ तालुक्यात तीन, हातकणंगले तालु्क्यात दोन; तर राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज तालुक्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार १३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यांपैकी १६८७ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४७ हजार १५८ रुग्ण पूर्ण बरे झाले.