वीज बिलात फक्त ४० पैशांची सवलत
By admin | Published: February 10, 2016 09:12 PM2016-02-10T21:12:32+5:302016-02-11T00:27:28+5:30
खेळखंडोबा सुरूच : किमान एक रुपया सवलतीची अपेक्षा असताना ४० पैशांमुळे यंत्रमागधारकांमध्ये नाराजी
इचलकरंजी : शासनाने जाहीर केल्याप्रमाणे यंत्रमाग उद्योगासाठी सवलतीच्या दराची बिले मिळाली असून, नवीन वीज दर २७ अश्वशक्तीपर्यंत तीन रुपये ९० पैसे, तर २७ अश्वशक्तीवर तीन रुपये ५० पैसे असा आहे. यंत्रमागासाठी किमान एक रुपयांची सवलतीची अपेक्षा असतानाच फक्त ४० पैसे सवलत मिळत असल्याने यंत्रमागधारकांमध्ये काहीशी नाराजी आहे.
यंत्रमाग उद्योगासाठी असलेल्या वीज दर सवलतीकरिता देण्यात येणारे अनुदान रद्द केल्यामुळे सन २०१४ पासून या उद्योगाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली. याचा परिणाम नोव्हेंबर २०१४ च्या वीज बिलामध्ये दिसू लागले. त्यामुळे राज्यातील सर्व यंत्रमाग केंद्रांमधून वाढीव वीज बिलाच्या विरोधात उठाव झाला. तेव्हा डिसेंबर महिन्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रमागाच्या वीज बिलामध्ये सवलत सुरू राहील, असे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात सवलतीचे वीज दर मिळाले नाहीत. आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह यंत्रमाग क्षेत्रातील सर्वच विधानसभा सदस्यांनी शासनाच्या लक्षात वारंवार ही बाब आणून देऊनसुद्धा वीज दरवाढीचा खेळखंडोबा सुरूच राहिला.
अखेर आमदार हाळवणकर व यंत्रमाग केंद्रांमधील विधानसभा सदस्यांचा रेटा पाहता शासनाने ७ नोव्हेंबर २०१५ ला निर्णय घेऊन विजेचे दर दोन रुपये ६६ पैसे राहतील, असे जाहीर केले. त्यानंतर यंत्रमागाच्या सवलतीच्या वीज दरामध्ये इंधन अधिभारासाठी देण्यात येणारे ५० टक्के अनुदान रद्द झाले असल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने पुन्हा ३ डिसेंबर २०१५ ला निर्णय करून ही सवलत सूट पुढे सुरू राहील, असे जाहीर केले. मात्र, याची अंमलबजावणीची तारीखच विसरल्यामुळे सवलतीचा दर लागू झाला नाही. म्हणून पुन्हा आमदार हाळवणकर यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांना खास पत्र लिहून ही बाब लक्षात आणून दिली. अखेर शासनाने सवलतीच्या दराचे आदेश दिल्यामुळे महावितरणच्या वाणिज्य विभागाकडून २० जानेवारीला परिपत्रक काढून नोव्हेंबर २०१५ पासून दोन रुपये ६६ पैसे हा सवलतीचा दर लागू करण्याचे निर्देश दिले. त्याचीही अंमलबजावणी जानेवारी महिन्यात झाली नाही. मात्र, आता फेब्रुवारी महिन्यामध्ये यंत्रमाग उद्योगांना आलेल्या वीज बिलात दोन रुपये ६६ पैसे या बेसिक वीज दराची अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत आहे. या वीज बिलामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत झालेल्या वीज वापराचा फरकसुद्धा समायोजित करून देण्यात आला आहे. त्यामुळे चालू महिन्यात आलेली बिले कमी वाटत असली तरी पुढील महिन्यात येणारी वीज बिले प्रतियुनिट तीन रुपये ९० पैसे व तीन रुपये ५० पैसे याच दराने येणार आहेत. (प्रतिनिधी)
चार कोटींचा फटका
यंत्रमाग उद्योजकांनी केलेल्या अपेक्षेप्रमाणे वीज बिलांमध्ये सवलत मिळालेली नाही. त्यामुळे काहीशी नाराजी आहे. आता येणारी वीज बिले शासन दोन रुपये ६६ पैसे दराने येतील, असे म्हणत असले तरी त्यावर लागणारे कर आणि इंधन अधिभाराचे समायोजन पाहता ती तीन रुपये ९० पैसे या दरम्यानच राहतील. यामुळे इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाला प्रतिमहिना चार कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितले.
अडीच रुपये इतकाच वीज दर असावा
यंत्रमाग उद्योगातून निर्माण होणारा सुलभ रोजगार आणि महाराष्ट्रातील व्याप्ती लक्षात घेता यंत्रमागासाठी लागणाऱ्या विजेसाठी स्वतंत्र वर्गवारी करावी, अशीही मागणी शासनाकडे गेल्या अनेक वर्षांची होती. त्यामध्ये आमदार सुरेश हाळवणकर यांनी पुढाकार घेतल्याने जून २०१५ मध्ये यंत्रमाग वीज दरपत्रकामध्ये स्वतंत्र वर्गवारी मिळवली; पण स्वतंत्र वर्गवारीबरोबर अपेक्षित सवलतींचा वीज दर काही मिळाला नाही. तरी वर्गवारीबरोबर आता यंत्रमागासाठीच्या विजेसाठी असलेले सर्व वीज कर आणि इंधन अधिभारासह दोन रुपये ५० पैसे इतकाच दर कायमस्वरुपी राहावा, अशी मागणी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी केली.