काही वकीलच म्हणे, लांबवतात 'तारीख पे तारीख.. !'; बार असोसिएशनकडे तक्रारी 

By उद्धव गोडसे | Updated: April 23, 2025 16:50 IST2025-04-23T16:50:18+5:302025-04-23T16:50:42+5:30

उद्धव गोडसे  कोल्हापूर : पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे काही वकीलच पक्षकारांचे काम लांबवत आहेत. तारखांवर ...

Only a few lawyers who play a key role in the process of getting justice, are delaying the work of the parties | काही वकीलच म्हणे, लांबवतात 'तारीख पे तारीख.. !'; बार असोसिएशनकडे तक्रारी 

काही वकीलच म्हणे, लांबवतात 'तारीख पे तारीख.. !'; बार असोसिएशनकडे तक्रारी 

उद्धव गोडसे 

कोल्हापूर : पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे काही वकीलच पक्षकारांचे काम लांबवत आहेत. तारखांवर तारखा घेऊन फक्त पैसे उकळतात, अशा पक्षकारांच्या तक्रारी आहेत. गेल्या वर्षभरात जिल्हा बार असोसिएशनकडे वकिलांच्या विरोधात ६० तक्रार अर्ज आले आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडेही तक्रारींचा ओघ वाढत आहेत. त्यामुळे वकिली व्यवसायाला बदनाम करणाऱ्या वकिलांना वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, अशी जुनी म्हण आपल्याकडे आहे. ही पायरी चढण्याची वेळ आलीच तर चांगल्या वकिलांची मदत घ्यावी, असा सल्ला दिला जातो. पण, ज्यांच्यावर विश्वास ठेवून न्यायालयात आपली बाजू मांडायची ते वकील तितके विश्वासू आहेत काय? असा प्रश्न अनेकदा पक्षकारांना पडतो.

पक्षकारांची अडवणूक करणाऱ्या काही वकिलांच्या विरोधात जिल्हा बार असोसिएशन, जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि बार कौन्सिलकडे तक्रारी येतात. तक्रारींची पडताळणी करून बार कौन्सिलकडून संबंधित वकिलांवर कारवाई केली जाते. गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या ६० तक्रारी जिल्हा बार असोसिएशनकडे आल्या. यातील काही तक्रारींमध्ये समेट घडवण्यात यश आले, तर काही तक्रारी कौन्सिलकडे सोपविल्याची माहिती असोसिएशनने दिली.

असे आहे तक्रारींचे स्वरूप

  • किरकोळ वादाच्या खटल्यांमध्ये तारखांवर तारखा घेऊन वेळ घालवणे
  • वाद मिटण्याऐवजी वाढतील असे सल्ले देणे
  • अनाठायी भीती घालणे
  • पक्षकाराच्या कामात दुर्लक्ष किंवा टाळाटाळ करणे
  • पक्षकारांकडून जादा पैसे घेणे
  • अपघात विम्याची रक्कम हडपणे
  • फीसाठी स्थावर, जंगम मालमत्तांचा ताबा घेणे


वकिलीबद्दलच शंका

शिरोळ तालुक्यातील एका वकिलांबद्दल न्यायाधीशांना शंका आली. संबंधित व्यक्ती वकील आहे काय? त्यांच्याकडे सनद आहे काय? त्यांच्या सनदचा नंबर काय? अशी विचारणा त्यांनी पत्राद्वारे जिल्हा बार असोसिएशनकडे केली. तसेच असोसिएशनकडे नोंदणी असलेल्या सर्व वकिलांची यादी मागवली. पण, असोसिएशनकडेच अजून अधिकृत वकिलांची यादी तयार नसल्याची बाब समोर आली आहे.

ठोस उपाययोजना गरजेच्या

असोसिएशनच्या निवडणुकीत मतदानाला उपयोग होतो म्हणून सनद न तपासता कोणालाही सभासद करणे गैरप्रकारांना प्रात्साहन देणारे ठरू शकते. जिल्ह्यात किती वकील काम करतात? त्यांची दरवर्षी असोसिएशनकडे नोंदणी होते काय? ते नियमानुसार काम करतात काय? यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यरत असायला हवी.

कौटुंबिक वादाच्या किरकोळ गुन्ह्यात अटकेची तरतूद नसतानाही वकिलांनी आम्हाला अटक होण्याची भीती घातली. अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपये घेतले. आपसात चर्चेतून मिटणारा वाद त्यांनी चिघळत ठेवला. अनावश्यक नोटिसा पाठवून वादात भर घातल्याचा अनुभव आम्हाला आला. - के. बी. पाटील - पक्षकार

सगळेच वकील एकसारखे नसतात. फक्त वकिलांमुळेच तारखा लांबतात असे नाही. अनेकदा यासाठी पक्षकार कारणीभूत असतात. न्यायालयात सुरू असलेल्या इतर कामांचाही विचार करावा लागतो. तरीही तक्रारी आल्या याचा अर्थ काहीतरी चुका घडल्या असाव्यात. - ॲड. मारुती पाटील

Web Title: Only a few lawyers who play a key role in the process of getting justice, are delaying the work of the parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.