भाजपकडून सक्षम उमेदवारच वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:29 AM2019-10-08T01:29:06+5:302019-10-08T01:30:56+5:30

समरजित त्यांच्या विश्वासावर कागलात प्रचार सभा घेत राहिले व तिकडे शिवसेनेने जे त्यांना हवे तेच केले. या सर्व घडामोडीत भाजपपेक्षा शिवसेनेचेच नेते दिलेला ‘शब्द’ जास्त पाळतात, असे चित्र पुढे आले.

Only able candidates from BJP are on the air | भाजपकडून सक्षम उमेदवारच वाऱ्यावर

भाजपकडून सक्षम उमेदवारच वाऱ्यावर

googlenewsNext
ठळक मुद्दे युतीचे राजकारण : पवारांना जे जमले ते भाजपला मात्र नाही जमले

विश्वास पाटील ।
कोल्हापूर : एका रात्रीत उमेदवार बदलून त्याला निवडून आणण्याची किमया यापूर्वी कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत करून दाखवली होती; परंतु अशी किमया या निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना करून दाखविता आली नाही. त्यामुळे तीन वर्षे भाजपचे कमळ हातात घेऊन गावोगावी फिरलेल्या समरजित घाटगे यांना ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली. चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर यांचाही भाजपची संगत केल्यामुळेच राजकीय बळी गेला.

समरजित घाटगे असतील किंवा डॉ. बाभूळकर असतील हे दोघेही उच्चशिक्षित, उत्तम प्रतिमा, दोघेही तरुण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार होते. त्यातील समरजित यांनी विधानसभा डोळ््यांसमोर ठेवूनच भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक भाजपचे कमळ चिन्ह घेऊन लढविल्या. मुख्यमंत्र्यांनी एकदा सोडून चारवेळा कागलमध्ये येऊन समरजित हेच आमचे उमेदवार असल्याचे हात उंचावून जाहीर केले आणि तरीही त्यांना शिवसेनेकडून ही जागा सोडवून घेता आली नाही.

विधानसभेच्या सन २००४च्या निवडणुकीत मालोजीराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापूर मतदारसंघातून सक्रिय होते. विधानसभेचे उमेदवार म्हणूनच त्यांना प्रोजेक्ट केले होते; परंतु ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. विधानसभेच्या सन १९८० च्या निवडणुकीत लालासाहेब यादव या मतदारसंघातून ७ हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघावर पारंपरिक हक्क होता. यातून मार्ग काढताना पवार यांंनी काँग्रेसला ही जागा तुम्हाला सोडतो परंतु उमेदवार आमचा असेल, असे सुचविले व तसे करून घेतले. त्यामुळे रात्रीत मालोजीराजे मुंबईत जाऊन त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला व त्यांना ही उमेदवारी मिळाली. उमेदवाराकडे निवडून येण्याची क्षमता असेल तर अशा गोष्टी युती, आघाडी करताना कराव्या लागतात. कागलमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय घाटगे यांनी युतीची उमेदवारी मिळाली तरच लढणार, असे अगोदर जाहीर केले होते. त्यामुळे ते उमेदवारी न मिळाल्यास लढणार नाहीत; हे स्पष्ट होते. त्यांच्या गटाची ताकद नक्कीच आहे; परंतु या निवडणुकीत त्यांची उमेदवारीच्या टप्प्यावर लढण्याची मानसिकता नव्हती. कारण ही जागा भाजपला जाणार, असे त्यांनाही वाटत होते; परंतु तसे घडले नाही आणि कागलच्या राजकारणात जे अपेक्षित होते तेच घडले.

चंदगडमध्येही डॉ.बाभूळकर यांना भाजपने बळ दिले. या मतदारसंघात दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांनी राष्ट्रवादीची चांगली बांधणी केली असल्याने बाभूळकर या राष्ट्रवादीकडून लढल्या असत्या तरी त्या सक्षम उमेदवार ठरू शकल्या असत्या; परंतु त्यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली आणि भाजपच्या वाट्याला हा मतदारसंघच आला नाही. त्यामुळे मूळच्या कुपेकर घराण्याच्या राजकारणाला या निवडणुकीत पूर्णविराम मिळाला. युती होणार नाही म्हणून भाजपने म्हणजेच मुख्यत: पालकमंत्री पाटील यांनी नेतृत्वाची पर्यायी फळी उभी केली तीच आता युतीच्या मार्गातील अडसर ठरू लागली आहे.


शिवसेनेने हवे तेच केले

समरजित घाटगे यांना शिवसेनेकडून लढावे लागणार, हे मुख्यमंत्र्यांना व प्रदेशाध्यक्षांना अगोदर पाच-सहा दिवस माहीत होते तर त्यांनी समरजित यांचा शिवसेना प्रवेश करून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यासाठी जे काही आवश्यक होते ते करायला हवे होते. समरजित त्यांच्या विश्वासावर कागलात प्रचार सभा घेत राहिले व तिकडे शिवसेनेने जे त्यांना हवे तेच केले. या सर्व घडामोडीत भाजपपेक्षा शिवसेनेचेच नेते दिलेला ‘शब्द’ जास्त पाळतात, असे चित्र पुढे आले.

Web Title: Only able candidates from BJP are on the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.