मराठा आर्थिक सबळ झाल्यावरच मोर्चे सार्थकी : राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:37 PM2019-07-07T23:37:22+5:302019-07-07T23:37:27+5:30
कोल्हापूर : आरक्षण मिळाले म्हणजे सर्व काही झाले नाही, सर्वोच्च न्यायालयातील लढाई सरकार लढेलच; पण मिळालेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन ...
कोल्हापूर : आरक्षण मिळाले म्हणजे सर्व काही झाले नाही, सर्वोच्च न्यायालयातील लढाई सरकार लढेलच; पण मिळालेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन मराठा समाज आर्थिक सक्षम झाला पाहिजे. ज्यावेळी समाज आर्थिकदृष्ट्या सबळ होईल, त्यावेळी मोर्चे सार्थकी ठरतील आणि आपणास खरा आनंद होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केले.
तसेच मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकेल; त्यासाठी राज्य सरकारने ख्यातनाम महाभियोक्ता (अॅटर्नी जनरल) तुषार मेहता यांची नियुक्ती केल्याची घोषणा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
कोल्हापूर सकल मराठा समाजातर्फे रविवारी कृतज्ञता सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी शाहू छत्रपती, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्यासह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नारायण राणे म्हणाले, ‘राणे समितीने आरक्षणाबाबतचा केलेला अहवाल न्यायालयात टिकेल, असा परिपूर्णच होता. आघाडी सरकारने आपल्या अहवालाधारे १६ टक्के आरक्षण दिले; पण सरकार बदलल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे थांबले. आरक्षणासाठी मोर्चे निघाले, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपणास शब्द दिला होता. त्याप्रमाणे पाळल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. गेल्या ४० वर्षांच्या मेहनतीला फळ मिळाले; पण पुढे काय? हा खरा प्रश्न असून, आरक्षणाच्या सवलतीचे प्रबोधन गावागावांत झाले पाहिजे. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व चळवळीतील कार्यकर्त्यांनी यासाठी नैतिक जबाबदारी घेऊन पुढे आले पाहिजे. आयएएस अधिकाऱ्यांचे प्रमाण मराठा समाजाचे कमी आहे, त्याचा विचारही केला पाहिजे. ज्यावेळी मराठा समाज आर्थिक सबळ होईल, त्यावेळीच राज्यात निघालेले ५८ मोर्चे सार्थकी ठरतील.
यावेळी खा. धैर्यशील माने, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, आ. उल्हास पाटील, आ. प्रकाश आबिटकर, आ. अमल महाडिक, आ. सुजित मिणचेकर, माजी खासदार धनंजय महाडिक, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, उर्वरित महाराष्टÑ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, मराठा महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष शशिकांत पवार, राष्टÑीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, सकल मराठा समाजाचे निमंत्रक जयेश कदम, समन्वयक दिलीप पाटील आदी, प्रमुख उपस्थित होते.
आरक्षणाच्या लढ्यात ‘लोकमत’चे बळ
मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात अभूतपूर्व मोर्चे निघाले. यामध्ये ‘लोकमत’ने सातत्याने बळ देण्याचे काम केले. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचा आवर्जून उल्लेख
प्रा. जयंत पाटील यांनी केला.
हुतात्म्यांच्या वारसांना नोकरी
मराठा आरक्षण लढ्यात ४२ जणांना हौतात्म्य आले. त्यांच्या वारसांना एस. टी. महामंडळात नोकरी दिलेली आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे राहिलेल्यांना लवकरच सेवेत समाविष्ट करून घेतले जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
राणे यांचे योगदान मान्यच
मराठा आरक्षणामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे योगदान मी मान्यच करीत असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. राणे समितीने तयार केलेला डाटा, लॉजिक हे आरक्षण देताना अतिशय उपयुक्त ठरल्याचे मंत्री पाटील यांनी आवर्जून सांगितले.
गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू
मराठा आरक्षण लढ्यात पोलिसांकडून दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील समिती आठवड्याला बैठक घेऊन खटले निकाली काढत आहे. आतापर्यंत पाच लाखांपर्यंत नुकसानीचे ४० गुन्हे निकाली काढले आहेत. उर्वरित गुन्ह्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.