गोकुळ सत्तारूढमधून कोण निसटणार हीच उत्सुकता; चौघांच्या भूमिकेकडे लक्ष : पॅनेलच्या रचनेवरच ठरणार गुलालाची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:12+5:302021-02-06T04:43:12+5:30

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलमधून कोण ...

The only curiosity is who will escape from the Gokul regime; Attention to the role of the four: Gulal's direction will depend on the composition of the panel | गोकुळ सत्तारूढमधून कोण निसटणार हीच उत्सुकता; चौघांच्या भूमिकेकडे लक्ष : पॅनेलच्या रचनेवरच ठरणार गुलालाची दिशा

गोकुळ सत्तारूढमधून कोण निसटणार हीच उत्सुकता; चौघांच्या भूमिकेकडे लक्ष : पॅनेलच्या रचनेवरच ठरणार गुलालाची दिशा

Next

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलमधून कोण निसटणार आणि विरोधी आघाडीला जाऊन मिळणार याबद्दलची मोठी उत्सुकता आहे. कारण त्यावरून या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. सद्य:स्थितीत ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांचे नाव त्यामध्ये प्राधान्याने घेतले जात आहे. ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्याबद्दलही संभ्रम असला तरी ते असा निर्णय घेतील का याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. शशिकांत पाटील चुयेकर यांनीही वेगळे ठराव दाखल केले होते आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे.

गोकुळच्या राजकारणात पाच ज्येष्ठ संचालकांकडे निर्णायक संख्येेने ठराव असल्याचे मानण्यात येते. त्यात सगळ्यात जास्त वाटा अर्थातच डोंगळे यांचा आहे. विधानसभा निवडणूक व त्या अगोदरही अध्यक्ष निवडीवरून त्यांचे संघाचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी वितुष्ठ आले आहे. त्यामुळे त्यांनी सत्तारूढ गटाची साथ सोडल्यात जमा आहे. त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरविले असल्याने ते विरोधी आघाडीबरोबरच राहतील हे स्पष्टच आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेली पाच वर्षे गोकुळच्या कारभाराविरोधात रान उठविले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या पालकमंत्री पाटील व मुश्रीफ यांची गट्टी आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात बेरजेचे राजकारण करायचे म्हणून ते गोकुळमध्ये सत्तारूढ आघाडीबरोबर जातील अशी शक्यता मध्यंतरी व्यक्त झाली; परंतु तसे घडण्याची शक्यता फारच धूसर आहे. कारण हे दोघेही राज्यातील सत्तारूढ आघाडीतील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे हे दोघे एकत्र येऊन गोकुळमध्ये पॅनेल होत आहे म्हटल्यावरच वातावरण बदलून जाणार आहे. मुश्रीफ विरोधी आघाडीचे प्रमुख नेते असल्यावर आमदार राजेश पाटील सत्तारूढ गटाबरोबर राहण्याची शक्यता नाही. कारण त्यांना आमदार करण्यात मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. शिवाय पक्ष सोडून ते बाजूला जाणार नाहीत. चंदगड तालुक्यात गोकुळच्या मतांचे त्यांना मोठे पाठबळ असल्याने त्यांच्या निर्णयाला महत्त्व आहे. महाडिक व विश्वास नारायण पाटील यांच्या संबंधात दरी निर्माण झाली असली तरी आमदार पी. एन. पाटील यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळेच ते काय भूमिका घेतात याचा अंदाज बांधणे अवघड असले, तरी ते डोंगळे यांच्यासोबत विरोधी पॅनेलचा भाग होतील अशीच शक्यता जास्त वाटते.

माजी अध्यक्ष अरुण नरके यांच्याऐवजी त्यांचा मुलगा चेतन यावेळी उमेदवार असेल; परंतु मूळच्या नरके गटातही मतविभागणी होईल. अध्यक्ष रवींद्र आपटे यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या पत्नी किंवा मुलगा सत्तारूढ पॅनेलमधून असू शकतो. रणजित पाटील सत्तारूढबरोबर राहणार असले, तरी इतर ज्येष्ठ संचालकांइतका मतांचा गठ्ठा त्यांच्याकडे नाही. उर्वरित संचालक हे सत्तारूढ गटाबरोबर राहतील.

विरोधी आघाडीलाही मर्यादा...

संघाचे एकूण मतदान ३९०० आहे. त्यामध्ये ५००-६०० मतांची जोडणी असलेले एक-दोन विद्यमान संचालक विरोधी आघाडीला मिळाले तर निवडणुकीचे चित्रच पालटू शकते. विरोधी आघाडीनेही गेल्या पाच वर्षांत संभाव्य उमेदवारांची फळी तयार केली आहे. त्यात तीन पक्षांना संधी द्यायची झाल्यास सत्तारूढमधील किती लोकांना घ्यायचे याचाही विचार विरोधी आघाडीला करावा लागणार आहे. सत्तारूढमधील कुणाला न घेताही पक्ष म्हणून सतेज-मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक हे एकदिलाने एकत्र आल्यास निवडणुकीत हवा निर्माण होऊ शकते.

Web Title: The only curiosity is who will escape from the Gokul regime; Attention to the role of the four: Gulal's direction will depend on the composition of the panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.