पानसरेंच्या स्मारकाची केवळ पायाखुदाईच...
By admin | Published: February 1, 2016 12:58 AM2016-02-01T00:58:26+5:302016-02-01T00:58:26+5:30
प्रशासकीय मान्यतांचे त्रांगडे : कामाच्या मुहूर्ताला नव्या ‘स्थायी’ची मंजुरी बाकी
तानाजी पोवार कोल्हापूर
ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचे स्मारक उभारण्यासाठी पायाखुदाई होऊन चार महिने उलटले तरीही महापालिकेच्या काही प्रशासकीय मान्यतेमुळे हे काम ‘जैसे थे’ स्थितीत आहे. यामुळे या स्मारकाला मुहूर्त कधी मिळणार, अशी विचारणा पानसरेप्रेमींतून होत आहे; पण महापालिकेतील स्थायी समितीचे नवे सभागृह आकारास आल्यानंतर या स्मारक प्रश्नाला गती मिळेल.
कॉ. गोविंदराव पानसरे यांचे २० फेब्रुवारीला प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या कार्याचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्याची कल्पना पानसरेप्रेमींतून पुढे आली. त्यानंतर या स्मारकासाठी जागा निश्चिती करण्यासाठी काही कालावधी गेला. ही जागा प्रतिभानगर येथील वि. स. खांडेकर प्रशालेजवळ घाईगडबडीत निश्चित झाली. या जागेसाठी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी दिली. चबुतरा उभारणीसाठी तत्कालीन स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी सुमारे पाच लाखांचा निधी मंजूर केला; पण हा निधी अपुरा असल्यामुळे पानसरेप्रेमींच्यावतीने हा निधी वाढवून मिळावा, अशी मागणी महानगरपालिकेकडे केली. हे स्मारक साकारण्यासाठी आदिल फरास यांच्यासह नामदेवराव गावडे, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, आदींनी वेळोवेळी पाठपुरावा केला.
दरम्यान, स्थायी समिती सभेत या स्मारकासाठी निश्चित करण्यात आलेली जागा चुकीची असल्याबाबत अनेकांनी मते मांडली. या मंजूर जागेमध्ये जमिनीखालून इलेक्ट्रीक आणि दूरध्वनी विभागाचे वायरिंग असल्याने ही जागा तेथून पुढे काही अंतरावर पुन्हा निश्चित करण्यात आली. त्यानंतर या स्मारकाच्या कामाला काही प्रमाणात गती मिळाली. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या स्मारकाच्या जागेत चबुतरा उभारणीसाठी पायाखुदाई करण्यात आली; पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर हे काम पुन्हा ‘जैसे थे’ स्थितीतच राहिले, ते आजपर्यंत तसेच आहे.
स्मारकाच्या बदललेल्या जागेसाठी महापालिकेची प्रशासकीय मंजुरी, जादा निधी, संरक्षण भिंत उभारणी, आदी धोरणात्मक व तांत्रिक बाबींची मंजुरी होणे बाकी आहे. त्यामुळे नव्या सभागृहातील स्थायी समिती जोपर्यंत अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत हे काम ‘जैसे थे’ अवस्थेतच राहणार आहे.
श्रमिकांच्या कार्याचे चित्रशिल्प साकारतेय
कॉ. पानसरे स्मारकासाठी चित्रशिल्प कसे असावे, याबाबत पानसरेप्रेमी व आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी एकत्रित बैठक घेतली. चित्रशिल्पाबाबतचे सर्वाधिकार राजेंद्र सावंत यांना देण्यात आले. त्यानुसार त्यांनी आराखडा तयार केला आहे. सद्य:स्थितीत व्यक्तींचे पुतळे बसविण्यास परवानगी नसल्याने कॉ. पानसरे यांनी केलेले काम आर्ट स्वरुपात मेडलवर साकारण्याची कल्पना पुढे आली आहे. आर्ट डिझाईनचे काम अशोक सुतार हे करत आहेत.