८१ टक्के परतावा देणारा देशातील एकमेव गोकुळ संघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:15+5:302021-04-28T04:27:15+5:30
कोपार्डे : दुधाचे दर पडले असतानाही दूध उत्पादकांना ८१ टक्के परतावा देण्याबरोबर दूध दरातील फरक ९८ कोटी ...
कोपार्डे : दुधाचे दर पडले असतानाही दूध उत्पादकांना ८१ टक्के परतावा देण्याबरोबर दूध दरातील फरक ९८ कोटी रुपये देणारा गोकुळ दूध संघ राज्यातच नव्हे, तर देशात एकमेव दूध संघ असून दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामुळेच ठरावधारक राजर्षी शाहू पॅनलबरोबर आहेत, असे प्रतिपादन आ. पी. एन. पाटील यांनी केले.
मंगळवारी फुलेवाडी येथे आमदार पी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांचा मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते.
राजर्षी शाहू आघाडीबरोबरच राहणार असल्याचे पन्हाळा तालुक्यातील ६१ पैकी ५७ ठरावधारकांनी निर्धार जाहीर केला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील होते.
पी. एन. पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघाचा कारभार पारदर्शीच आहे. नियमानुसार उत्पादकांना उत्पन्नातील ७० टक्के द्यायचे आणि ३० टक्के खर्चाला द्यायचे, पण आम्ही दूध उत्पादकांना ८१ टक्के परतावा वाटप करतो आणि फक्त १९ टक्क्यात खर्च भागवतो. हे गोकुळ दूध संघ चांगला चाललेल्याचे द्योतक नव्हे काय. म्हणूनच गोकुळची राज्यात व देशात एक नंबर दूध संघ म्हणून गणना होते. गोकुळ चांगला चालल्याशिवाय चारशे कोटींच्या ठेवी आहेत काय, असा प्रश्न उपस्थित करत कोरोना काळातही ३, १३ व २३ तारखेला न चुकता बिले दिली. दुधातील फरक ९८ कोटी रुपये आहे. मधल्या काळात तीन-चार महिने संपूर्ण दुधाची पावडर केली. तरीसुद्धा ठेवी असल्यामुळे उत्पादकांना वेळेत बिले देऊ शकलो. आम्ही शेतकऱ्याच्या घामाचा पैसा शेतकऱ्याला देतोय. त्यामुळे राजर्षी शाहू आघाडीला प्रचंड ताकदीने सहकार्य करावे, असे आवाहन केले. ६१ पैकी ५७ ठरावधारकांनी उपस्थिती लावली.
यावेळी यशवंत बँकेचे संचालक निवास पाटील, शशिकांत आडनाईक, एन. सी. पाटील, शाहू काटकर, सुहास राऊत, भरत मोरे, पी. डी. हंकारे यांची मनोगत झाली. उपस्थित सर्व ठरावधारकांनी गोकुळचा कारभार चांगला चालला असून राजर्षी शाहू आघाडीबरोबरच राहण्याचा एकमुखी निर्धार केला.
फोटो २७फुलेवाडी
फुलेवाडी येथे अमृत हॉलमध्ये करवीर विधानसभा मतदारसंघातील गोकुळच्या ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना आ. पी. एन. पाटील. शेजारी विलास पाटील, शाहू काटकर.