अवघ्या करवीरनगरीत शाहू‘नाद’

By Admin | Published: June 27, 2017 12:54 AM2017-06-27T00:54:04+5:302017-06-27T00:54:04+5:30

ढोल-ताशांच्या ठेक्यात उत्साह : चित्ररथ ठरले लक्षवेधी; शहरातील ७८ तालीम संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Only Karveerangar Shahu Nad ' | अवघ्या करवीरनगरीत शाहू‘नाद’

अवघ्या करवीरनगरीत शाहू‘नाद’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पावसाची रिपरिप आणि ढोल-ताशांचा ठेका, हलगीचा कडकडाट आणि घुमक्याच्या ठेक्यावर तल्लीन होऊन लेझीम खेळणारे युवक अशा वातावरणात वरुणराजाच्या साक्षीने लोकराजा राजर्षी शाहूराजांची दिमाखदार मिरवणूक सोमवारी कोल्हापूर शहरात झाली. शाहू जयंतीनिमित्त कोल्हापुरात मिरजकर तिकटी येथून प्रारंभ झालेल्या या मिरवणुकीत शाहूराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला. या मिरवणुकीत शहरातील सुमारे ७८ तालीम संस्थांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
दिवसभर पावसाचे वातावरण असल्याने मिरवणुकीत वरुणराजाचे आगमन होणार हे निश्चित होते. सायंकाळी येथील मिरजकर तिकटी येथून या मिरवणुकीचा प्रारंभ शाहू छत्रपती यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मिरवणुकीला प्रारंभ होताच मुसळधार पाऊस आला; पण या पावसातच या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत राजर्षी शाहूराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन केले होते. मिरवणुकीत विविध तालीम संस्थांचे पदाधिकारी भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. ‘करवीर नाद’चे ढोेल-ताशा पथक आणि हलगीच्या ठेक्यावर कोगील बुद्रुक येथील जय हनुमान लेझीम मंडळाच्या लहान मुला-मुलींंनी मिरवणूक मार्गावर उपस्थितांचे लक्ष वेधले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंची आठवण करून देणारे चित्ररथ सहभागी होते. ही मिरवणूक मिरजकर तिकटी येथून बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाईन, महापालिका चौक, सीपीआर रुग्णालयामार्गे दसरा चौकात आल्यावर तेथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक पुन्हा बिंदू चौकमार्गे शिवाजी चौकात रात्री उशिरा पोहोचली.
यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निमंत्रक बाबा महाडिक, बाबा पार्टे, डॉ. सतीश पाटील, केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. हिंदुराव हुजरे-पाटील, अजयसिंह देसाई, माजी महापौर आर. के. पोवार, बबन रानगे, अशोक पोवार, संजय आयरेकर, चंद्रकांत यादव, उदय घोरपडे, नरेंद्र इनामदार, सुरेश जरग, पी. जी. पाटील, उदय घोरपडे, स्वप्निल पार्टे, श्रीकांत भोसले, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज उस्ताद, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


जिवंत देखावा
मिरवणुकीत राजर्षी शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्ट यांनी बग्गीमध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा जिवंत देखावा साकारला होता. तो मिरवणुकीत लक्षवेधी ठरला होता. याशिवाय पारंपरिक लवाजम्यासह १२ बैलगाड्या, १६ घोडे व छत्रपती ताराराणींचा सजीव देखावाही साकारला होता.


मिरवणुकीत शिवाजी पेठेतील झुंजार मर्दानी खेळाच्या आखाडाच्या मावळ्यांनी मर्दानी खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके दाखविली. यामध्ये तलवारबाजी, लाठी-काठी, फरी-गदगा, दांडपट्टा, लिंबू-तलवार यांचा समावेश होता.
भर पावसातही तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह पूर्ण मिरवणुकीत ओसंडून वाहत होता. मिरवणुकीच्या मार्गावर मुसळधार पावसातही अनेक कार्यकर्त्यांनी लेझीम खेळून उत्साहात भर टाकली.

Web Title: Only Karveerangar Shahu Nad '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.