वैद्यकीय, जीवनावश्यक, निर्यातदार उद्योगांनाच परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:42+5:302021-05-26T04:25:42+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात केवळ वैद्यकीय, जीवनावश्यक साहित्य, निर्यात करणाऱ्या उद्योगांनाच काही अटींवर परवानगी देण्यात येत आहे. उद्योगाच्या ...
कोल्हापूर : जिल्ह्यात केवळ वैद्यकीय, जीवनावश्यक साहित्य, निर्यात करणाऱ्या उद्योगांनाच काही अटींवर परवानगी देण्यात येत आहे. उद्योगाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय तसेच कोरोना चाचणी करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग उच्चांकावर असून अन्य जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या कमी होत असताना कोल्हापूरमध्ये मात्र रोजची पॉझिटिव्ह संख्या व मृत्यूदरदेखील जास्त आहे त्यामुळे जिल्ह्यात आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला होता. आता पुन्हा राज्याच्या ब्रेक द चेनचे नियम लागू झाले असून सकाळी ७ ते ११ यावेळेत जीवनावश्यक वस्तू व सेवांना परवानगी देण्यात आली आहे. आठ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यातील तीनही औद्योगिक वसाहती व सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. आता या उद्योगांना नियम अटी लागू करुन परवानगी देण्यात आली आहे.
याअंतर्गत केवळ वैद्यकीय कारणासाठी लागणारी उत्पादने, जीवनावश्यक साहित्यांचे उत्पादन, निर्यातीचे उद्योग व बंद न करता येणारे सातत्यपूर्ण उद्योग सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय व सर्वांची ॲन्टिजन आणि लक्षणे असल्यास आरटीपीसीआर करणे बंधनकारक केले आहे. उद्योगाच्या ठिकाणी कोरोनाविषयक नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी १३ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जाईल असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
--
तरच ऑक्सिजन वापरास परवानगी
काही उद्योगांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो, त्या उद्योजकांनी ३० टक्के ऑक्सिजन वापराची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. यावर जिल्हा प्रशासनाने ज्या उद्योगांमध्ये वैद्यकीय व जीवनावश्यक उत्पादने घेतली जातात त्याच उद्योगांना ऑक्सिजन वापराची परवानगी असेल असे स्पष्ट केले.
---
कोरोनाबाबत आज बैठक
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याच विषयावर आज बुधवारी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार आहे.
---