मोदी आणि येडीयुरप्पा हे ‘डबल इंजिन’च कर्नाटकला तारू शकते - अमित शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:22 AM2021-01-18T04:22:48+5:302021-01-18T04:22:48+5:30
बेळगाव दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जनसेवक मेळावा रविवारी सायंकाळी जिल्हा क्रीडांगणावर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी ...
बेळगाव दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जनसेवक मेळावा रविवारी सायंकाळी जिल्हा क्रीडांगणावर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. याप्रसंगी बोलताना अमित शहा यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष आमदार नवीनकुमार कटील आणि मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपला जे घवघवीत यश मिळाले, त्याला तोड नाही. राज्यात ५५ टक्क्यापेक्षा जास्त जागा भाजपाने जिंकल्या. याबद्दल मी समस्त जनतेचा आभारी आहे, असे सांगून गृहमंत्री अमित शहा यांनी, केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती दिली.
आगामी तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीमध्येही जनतेने भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ या घोषणेने त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोनवेळा बेळगावचा उल्लेख ‘मुंबई-कर्नाटकातील’ बेळगाव असा केला, हे विशेष होय. मुख्यमंत्री बी. एस.
येडीयुरप्पा यांचे देखील यावेळी समयोचित भाषण झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी प्रास्ताविक भाषण केले.