अंबाबाई मंदिराचे नुसतेच आराखडे

By admin | Published: March 30, 2017 01:27 AM2017-03-30T01:27:14+5:302017-03-30T01:27:14+5:30

विकासाची कोटींची उड्डाणे कागदावरच : आठ वर्षे फक्त चर्चा, सूचना, दुरुस्त्या, बदल

Only the plans of Ambabai Temple | अंबाबाई मंदिराचे नुसतेच आराखडे

अंबाबाई मंदिराचे नुसतेच आराखडे

Next

इंदुमती गणेश -- कोल्हापूर --अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्यांचा फेरा आठ वर्षांनंतरही सुटलेला नाही. शहराच्या दोन हजार कोटींच्या आराखड्यापासून सुरू झालेला हा प्रवास १२० कोटी, त्यानंतर ५० कोटी, पुढे सूचना, दुरुस्त्या करून २५० कोटी, पहिला टप्पा ७० कोटींचा आणि आता ९० कोटींचा झाला आहे. कोट्यवधींची ही उड्डाणे कागदावरच झाली असून अंबाबाई मंदिरात इंचभरही बदल झालेला नाही. नव्या चर्चा, सादरीकरण, सूचना, बदल आणि फेरआराखडा या फेऱ्यातून करवीर निवासिनी श्री अंबाबाईची सुटका कधी होणार, असा प्रश्न पडला आहे.
एखाद्या देवस्थानालादेखील लालफितीच्या शासकीय कारभाराच्या दुर्दैवाचा फेरा कसा लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणून आता अंबाबाई मंदिर सांगता येईल. सन २००९ सालापासून सुरू झालेले आराखड्याचे फेरे आठ वर्षांनंतरही थांबलेले नाहीत. साडेतीन शक्तिपीठ असलेल्या अंबाबाई मंदिराला दरवर्षी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लाखोंनी वाढ होत असताना अंबाबाई मंदिराचे जतन, संवर्धन, भाविकांसाठी अन्नछत्र, यात्री-निवास पार्किंगसारख्या सोयी-सुविधा निर्माण करण्यात अद्याप महापालिका आणि देवस्थान समितीला यश आलेले नाही.
अंबाबाई मंदिराचा पहिला आराखडा सादर झाला सन २००९ मध्ये. स्थलांतराला परिसरातील नागरिकांनी विरोध केला. त्यानंतर पुढील तीन वर्षे तोच आराखडा फिरवून मांडला जायचा. चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा विषय मनावर घेतला आणि आराखड्यात दुरुस्त्या, बदल सुचविले. आराखडा जनतेसमोर सादर झाल्यावर पुन्हा दुरूस्त्या झाल्या, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत चंद्रकांतदादांनी आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर विभागीय आयुक्तांनी त्यावर बरेच बदल, स्फुटणी, आॅडिट अशा सूचना दिल्या. आता देवस्थान समितीच्यावतीने करण्यात येणाऱ्या जतन संवर्धन आणि अन्य कामांचा समावेश करून पहिल्या टप्प्यातील आराखडा ९० कोटींवर गेला आहे. तो सोमवारी शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.


हे विषय लागले मार्गी...केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण २०१४ मध्ये सुरू झाले आणि हे काम दीड ते पावणेदोन वर्षांत संपले. आता दुसऱ्या टप्प्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
कोल्हापूर चित्रनगरी विकासकामांचा नारळ फुटून आता तेथे दिमाखात नवे भव्य सेट उभारले जात आहेत.
गेल्या वर्ष दीड-वर्षात बनविण्यात आलेल्या जोतिबा मंदिराच्या २५ कोटींच्या आराखड्यालाही शासनाने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली.
मात्र, सर्वांत आधी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार होऊनही तो मार्गी लागलेला नाही.

Web Title: Only the plans of Ambabai Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.