कोल्हापूरच्या रस्त्यावर उद्यापासून केवळ पोलीसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:47+5:302021-05-15T04:21:47+5:30
कोल्हापूर : लाॅकडाऊन काळाकरिता आज, शनिवारी मध्यरात्रीपासून पोलीस प्रशासनाने तीन शिफ्टमध्ये ३५०० पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि गृहरक्षक दलाचे जवान, ...
कोल्हापूर : लाॅकडाऊन काळाकरिता आज, शनिवारी मध्यरात्रीपासून पोलीस प्रशासनाने तीन शिफ्टमध्ये ३५०० पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि गृहरक्षक दलाचे जवान, असा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. या सर्वांची नजर विनाकारण फिरणाऱ्यांवर राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आज, शनिवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन लागू केला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यात सकाळी ६ ते ११ त्या त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वत: हद्दीतील पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहायक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी हद्दीत ठिय्या मारणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत त्या खालील अधिकारी हद्दीतील बंदोबस्तामध्ये सहभागी होऊन कारवाई करण्यास मार्गदर्शन करणार आहेत. या काळात उपाधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंतर्गत पोलीस ठाण्यांचा कारभार पाहणार आहेत. केवळ पोलीस ठाण्यांमध्ये ठाणे अंमलदार व तपास पथके राहणार आहेत. ग्रामीण भागातही पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी व उपविभागीय अधिकारी बाधित क्षेत्राला भेट देऊन तेथे नियमावलीचे पालन होते का नाही, याची पाहणी करणार आहेत. त्यांना याकामी ग्राम समिती मदत करणार आहे.
बंदोबस्त असा
- २०० अधिकाऱ्यांसह २२०० पोलीस कर्मचारी आणि ११०० गृहरक्षक दलाचे जवान असा ३५०० जणांचा समावेश.
- जिल्ह्यातील १७ एन्ट्री पाॅइंटवर तीन शिफ्टमध्ये बंदोबस्त तैनात.
- प्रत्येक एन्ट्री पाॅइंटवर ई पास सक्तीचा असून येणाऱ्याची आरटीपीसीआर सक्तीची केली आहे.
- आंतरजिल्हा व आंतरराज्य तपासणी नाक्यावर विशेष पोलीस बंदोबस्त.
अशीही सोय
या काळात नागरिकांना काही आपत्ती आल्यास अथवा गरीब लोकांना अन्नपाण्याची गरज लागल्यास त्यांनी केवळ नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती द्यावी. हा कक्ष २४ तास सेवेत राहणार आहे. या सेवेत आपत्ती, इलेक्ट्रिकल शाॅर्टसर्किट होऊन वायरिंग जळाल्यास त्याकरिता इलेक्ट्रिशियनचे पथकही तयार केले आहे. याशिवाय पाण्याचे पाइप फुटले तरी प्लंबर घरी येऊन ते दुरुस्त करणार आहे. त्यामुळे नागरिकांना या काळात घरीच राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक बलवकडे यांनी केले आहे.
वरिष्ठ डाॅक्टरावरच रेमडेसिविरची जबाबदारी
अनेक रुग्णालयांत रेमडेसिविरचे डोस रुग्णांना दिले जातात की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी त्या त्या रुग्णालयाच्या वरिष्ठ डाॅक्टरांची राहणार आहे. त्यामुळे रेमडेसिविरच्या काळाबाजाराला प्रतिबंध होईल. याबाबतच्या सूचना पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना दिलेल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली.