गरीब विद्यार्थीच देणार झोपडपट्टीतील विद्यार्थिनीला दिवाळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 05:40 PM2020-11-12T17:40:48+5:302020-11-12T17:42:17+5:30
फटाके न उडवता त्या पैशातून शाळेतीलच विद्यार्थिनीला दिवाळीला कपडे, चप्पल घेण्याची परंपरा याहीवर्षी शिवाजी मराठा हायस्कूलचे विद्यार्थी पाळणार आहेत. कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : फटाके न उडवता त्या पैशातून शाळेतीलच विद्यार्थिनीला दिवाळीला कपडे, चप्पल घेण्याची परंपरा याहीवर्षी शिवाजी मराठा हायस्कूलचे विद्यार्थी पाळणार आहेत. कलाशिक्षक मिलिंद यादव यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या या उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष आहे.
शिवाजी मराठा हायस्कूलचे कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी नउ वर्षापूर्वी आगळीवेगळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची संकल्पना शाळेतील विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांनीही जोमाने ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. या उपक्रमाला शाळेचे संस्थापक,मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला.
या शाळेत शिकणारे बहुतेक विद्यार्थी हे गरीब कुटूंबातील विशेषत: सुधाकर जोशीनगर झोपडपट्टीतच राहतात. मोलमजुरी करुन त्यांचे पालक आपल्या पाल्यांना शिक्षण देत असतात. बºयाचदा या विद्यार्थ्यांना आईवडिलांच्या आग्रहाखातर शालेय शिक्षणाला दांडी मारुन रोजंदारीवर जाणे भाग पडत असते. तरीही हे विद्यार्थी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत असतात. मुलांमध्ये काम करणाऱ्या आणि चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या मिलिंद यादव या कलाशिक्षकाच्या प्रयत्नातून या मुलांना शिक्षणाची गोडी लागली.
त्यातूनच आपल्याच सहकाऱ्यांची दिवाळी चांगली व्हावी, यासाठी कपडे आणि चप्पल देण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला. हातावरची पोटं असणाºया कुटूंबातील या विद्यार्थ्यांनाही त्याचे महत्व समजले आणि थोडेफार मिळणारे पैसे या उपक्रमासाठी साठवू लागले. जवळपास २0 ते २२ विद्यार्थ्यांनी पैसे जमा केले आहेत. त्यांनी जमा केलेल्या पैशात तितक्याच रक्कमेची भर टाकण्याचा पायंडाही स्वत: मिलिंद यादव यांनी पाडला, तो आजही कायम आहे.
या उपक्रमाचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. कोरोनामुळे या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत जाता येत नसले तरी झोपडपट्टी परिसरातील महादेव मंदिरात एकत्र येउन बालदिनाच्या पूर्वसंध्येला, उद्या, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता झोपडपट्टीतील अतिशय गरीब असलेल्या एका आजारी विद्यार्थिनीला दिवाळीची भेट देण्यात येणार आहे.
शाळेतील माजी विद्यार्थीही देणार मदत
यावर्षी या शाळेत शिकून बाहेर पडलेल्या १९९८ च्या बॅचचे विद्यार्थीही या उपक्रमाला आर्थिक हातभार लावत आहेत. बाहेरगावी असलेल्या बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनीनी कोल्हापूरात राहणाऱ्यां एका सहकाऱ्याकडे ही रक्कम पाठवून ती मिलिंद यादव यांच्याकडे सुपूर्द केली आहे.