कोल्हापूर सुरक्षित, सुसज्ज होतंय याचंच समाधान : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:12 AM2020-06-20T11:12:14+5:302020-06-20T11:14:27+5:30
कोरोना महामारीच्या संकटात कोल्हापूर सुरक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज होत असल्याचे मला समाधान वाटत असले तरी, या सुविधांचा लाभ घेण्याचा कोल्हापूरकरांवर प्रसंग येऊ नये, अशी माझी अंबाबाईचरणी प्रार्थना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री सीपीआर रुग्णालयातील अद्ययावत कोरोना वॉर्डच्या लोकार्पण समारंभात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना केले.
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या संकटात कोल्हापूर सुरक्षित आणि वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज होत असल्याचे मला समाधान वाटत असले तरी, या सुविधांचा लाभ घेण्याचा कोल्हापूरकरांवर प्रसंग येऊ नये, अशी माझी अंबाबाईचरणी प्रार्थना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री सीपीआर रुग्णालयातील अद्ययावत कोरोना वॉर्डच्या लोकार्पण समारंभात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना केले.
शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. धनंजय लाड यांच्या क्रॉम क्लिनिकल ॲन्ड मेडिकल टुरिझम प्रा. लि. या आंतरराष्ट्रीय कंपनीतर्फे सीपीआर रुग्णालयास ३४ बेडस्चा प्रशस्त कोरोना वार्ड देणगीस्वरूपात तयार करण्यात आला असून, त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना संसर्गाच्या काळात केलेल्या चांगल्या कार्याबद्दल ठाकरे यांनी सीपीआर रुग्णालयासह जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले. संकट गंभीर असताना लोक लढण्यास पुढे येत आहेत. आरोग्याच्या सुविधा वाढविण्यास मदत करीत आहेत. आज कोल्हापुरामधील वैद्यकीय सुविधेत क्रॉमच्या सहकार्यामुळे भर पडली. मोठा सहभाग दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते, त्याकडे कोरोनाने लक्ष वेधले. आपले डोळे उघडले. आता डोळ्यांना झापड लावून बसलो तर त्यााला अर्थ राहणार नाही. सरकार तर या सुविधा देण्यास पुढे येत आहे; परंतु त्यापुढेही जाऊन क्रॉमसारख्या संस्था पुढे येत आहेत हे कौतुकास्पद आहे, असे ठाकरे म्हणाले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली समाजसेवेची शिकवण आमच्या रक्तात भिनली आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच ही सुविधा देण्यास मदत झाली. क्रॉमचे धनंजय लाड यांचे सहकार्य झाले, असे सांगितले. यावेळी देवस्थान समितीच्या खजिनदार वैशाली क्षीरसागर यांनी देवस्थान समितीतर्फे सहकार्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्वातंत्र्यसैनिक हरिबा लाड, डॉ. महेंद्र बनसोडे, नितीन पाटील यांची भाषणे झाली. प्रारंभी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
आता देखभालीचीही जबाबदारी
क्रॉमचे संचालक डॉ. धनंजय लाड यांनी कोल्हापूरशी असलेल्या ऋणानुबंधातून मी सीपीआरसाठी काहीतरी करू शकलो. कोल्हापूरची माती माझी असून या मातीचे पांग फेडल्याचे समाधान मला आज मिळाले, असे सांगितले. कोरोना वॉर्डमध्ये १४ आयसीयू, तर २० ऑक्सिजन बेड्स तयार करून दिले आहेत. या सुविधांमध्ये त्रुटी राहू नयेत म्हणून त्यांची देखभाल-दुरुस्तीची सर्व जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले.