टॅब असेल तरच होणार पशुगणना : पन्हाळा तालुक्याचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:40 PM2018-12-14T23:40:39+5:302018-12-14T23:41:59+5:30
दर पाच वर्षांनी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना केली जाते. पन्हाळा तालुक्यात पशुगणना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून टॅब व इतर साहित्य देण्यात येणार होते
संजय पाटील ।
देवाळे : दर पाच वर्षांनी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना केली जाते. पन्हाळा तालुक्यात पशुगणना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून टॅब व इतर साहित्य देण्यात येणार होते. मात्र, ते प्राप्त झाले नसल्याने पाच वर्षे उलटली तरीही प्रत्यक्षात तालुक्यामध्ये पशुगणनेस सुरुवात झालेली नाही.
शासकीय योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळावा म्हणून विविध योजना राबविल्या जातात. तालुक्यात १९ वी पशुगणना सन २०१२ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी पशुपालकांच्या घरोघरी जाऊन रजिस्टरवर पशूंची नोंद करण्यात आली होती. मात्र, २० वी पशुगणना ही टॅबवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे या टॅबच्या माध्यमातून सर्वप्रथम पशुपालकांची माहिती भरल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या पशुंची माहिती भरता येणार आहे. इतकेच नव्हे तर टॅबमध्ये नोंद घेणाऱ्या प्रगणकांचे लोकेशन वरिष्ठ अधिकाºयांना पाहता येणार आहे. त्यामुळे बोगस पशुगणनेला आळा बसणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुधनाची संख्या स्पष्ट होणार आहे. पशुधनासाठी असणाºया योजनांचा फायदा पशुपालकांना होणार आहे परंतु, पाच वर्षांचा कालावधी उलटला असला तरी पशुसंवर्धन विभागाला तालुक्यातील पशुगणना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून टॅब मिळालेले नाहीत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत पशुगणना झालेली नाही.
पशुगणना झाली असती तर यावर्षी तालुक्यात चारा किती लागणार आहे. किती चारा शिल्लक आहे. याबाबतची माहिती संबंधित विभागाला समजली असती; परंतु वरिष्ठ स्तरावरून उदासीन भूमिका पशुगणनेला मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
चाऱ्याचे नियोजन करताना अडचणी
पन्हाळा तालुक्यात सन २०१२ च्या पशुगणनेनुसार तीस हजार गायी, एकोणसत्तर हजार म्हशी, बारा हजार मेंढ्या, ८८ हजार बॉयलर पक्षी असे सुमारे दोन लाखाच्या आसपास मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. त्यामुळे पावसाळ्यात, उन्हाळ्यात जनावरांच्या चाºयाचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे भविष्यात अनेक पशुपालकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
पशुगणना अद्याप सुरू झालेली नाही. लवकरच वरिष्ठ पातळीवरून टॅब देण्यात येणार आहेत. त्यानंतर टॅबद्वारे पशुगणना कशी करायची याचे संबंधितांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतरच पशुगणना सुरू होईल.
- ए. व्ही. गावडे
(तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)