केवळ पक्ष्यांसाठी दिले दहा गुंठ्यातील पीक
By admin | Published: September 14, 2015 12:13 AM2015-09-14T00:13:45+5:302015-09-14T00:18:28+5:30
सोनुले बंधूची भूतदया : पाण्यासाठी मडकी बांधून केली सोय
बाबासाहेब नेर्ले ल्ल गांधीनगर
शेताच्या बांधासाठी, सरीसाठी भावा-भावात, शेजाऱ्यात हाणामारीचे प्रकार आपण नेहमी ऐकतो पण गडमुडशिंगीपैकी लक्ष्मीवाडी येथील (ता.करवीर) सोनुले बंधुनी एक-दोन नव्हे तर तब्बल आपल्या मालकीच्या दहा गुंठे जमिनीतील पीक फक्त पक्ष्यांसाठीच घेतले आहे. अशोक लहू सोनुले आणि बाळासाो लहू सोनुले या भावांनी पक्षीप्रेमातून हा भूतदयेचा वसा जपला आहे.
सोनुले बंधुनी आपल्या मालकीची (गट नं. ३२३) दहा गुंठे जमीन ही अगदी फोंड्या माळरानावर असूनही त्यामध्ये जूनच्या मृग नक्षत्रावर ज्वारीची पेरणी केली. कष्टामुळेपीकही जोमाने आले.
दरम्यान, ज्वारीचे पीक जोमात आल्याने येथे पक्ष्यांचे थवे हुरडा खाण्यास येऊ लागली. या शेतामध्ये असलेल्या एक बाभळीचे झाडाला अनेक पक्ष्यांनी घरटीही बांधली आहेत, पण त्यांना पाणी पिण्यासाठी दूर जावे लागत असल्याने सोनुले बंधंूनी बाभळीच्या झाडाला तसेच कणसांच्या घाटालाच मडकी बांधून या पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या ५०० ते ६०० एकरांत असलेल्या फोंडा माळरानावर पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे येथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तरीही सोनुले यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली आहे.