राजर्षी शाहू महाराजांचे विचारच ध्रुवीकरण रोखतील, शाहू छत्रपतींनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:06 PM2022-05-23T12:06:48+5:302022-05-23T12:07:22+5:30
मशिदीवरील भोंगे आणि हनुमान दर्शनासारखे लोकशाहीमध्ये महत्त्व नसलेले विषय पुढे येत आहेत.
कोल्हापूर : मशिदीवरील भोंगे आणि हनुमान दर्शनासारखे लोकशाहीमध्ये महत्त्व नसलेले विषय पुढे येत आहेत. परंतु या सर्व ध्रुवीकरणाला छत्रपती शाहू महाराजांचे विचारच रोखतील, असा विश्वास शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला.
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त आयोजित कृतज्ञता पर्वाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्यायमंत्री विश्वजित कदम, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू छत्रपती म्हणाले, १२० वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी सर्व मंदिरे सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी खुली केली. नंतर देशात कायदा केला गेला. सध्याच्या परिस्थितीमध्ये शाहूंचे विचार पुढे नेण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. लोकप्रतिनिधींवर ही जबाबदारी असून याची सुरुवात कोल्हापूरमधून झाली आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारने यात योगदान द्यावे.
ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, मी ज्या शाळेत शिकलो, ज्या वसतिगृहात राहिलो, महाविद्यालयात शिकलाे, त्या सर्व शाहू महाराजांच्याच नावच्या संस्था आहेत. एकाअर्थाने मी ‘शाहू प्रॉडक्ट’ आहे.
मंत्री विश्वजित कदम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते बालगंधर्वांपर्यंत अनेकांना शाहू महाराजांनी पाठबळ दिले. त्यांच्या विचाराचा धागा पकडून तृतीयपंथीयांना ओळखपत्रे देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, शाहू महाराजांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले काही महिने लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते राबत होते. या माध्यमातून ६० हून अधिक कार्यक्रम केवळ एका महिन्यात घेण्यात आले. २६ जून रोजी शाहू जन्मस्थळ लोकार्पण करण्याचा मानस आहे.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अजूनही शाहू विचारांचा किती पगडा आहे, हे कोल्हापूरच्या नागरिकांनी दाखवून दिले आहे. मागासलेल्यांना १००/१०० एकर जागा वाटणारा असा हा विलक्षण लोकराजा होता. याच काळात राज्यात धार्मिक तेढ वाढविण्याचे काम सुरू असताना कोल्हापूर शांत राहिले. याला शाहूंचे विचारच कारणीभूत आहेत.
शाहू महाराजांचे आगमन अन् सभागृहाचे अभिवादन
यानिमित्ताने हिलरायडर्स निर्मित आणि सागर बगाडे दिग्दर्शित शाहू राज्यारोहण कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रेक्षकांमधूनच लवाजम्यासह शाहू महाराज रंगमंचावर आले. तेव्हा त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण सभागृह उठून उभे राहिले. यावेळी शाहू महाराजांच्या घोषणांनी केशवराव भोसले नाट्यगृह दुमदुमून गेले.