...तरच संविधानाला अभिप्रेत सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 12:53 AM2017-01-04T00:53:32+5:302017-01-04T00:53:32+5:30
यशवंत मनोहर : गवळी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरव
कोल्हापूर : जात, धर्म हे अहिताचे असून, या भिंती तोडायला हव्यात. आपल्यातील अविश्वास बाजूला सारून परिवर्तनवादी, अल्पसंख्याक एकत्र आल्यास संविधानाला अभिप्रेत असलेली सत्ता देशात राबविली जाईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले.
कोल्हापूर येथील आबाजी सुबराव आणि आकुताई आबाजी गवळी प्रतिष्ठानतर्फे डॉ. मनोहर यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मंगळवारी हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एन. बी. ताठे होते.
डॉ. मनोहर म्हणाले, जात, धर्म आपल्याला सत्तेच्या परिघाबाहेर ठेवतो. अल्पसंख्याक जोपर्यंत बहुसंख्य होत नाहीत, तोवर त्यांच्या हाती सत्ता येणे शक्य नाही. जुन्या नोटा जशा बदलल्या, तशी आपली मने बदलून एकत्र या. एकमेकांबद्दल असलेला अविश्वास बाजूला ठेवा. जुन्या मनाचं, संस्काराचं चलन बदलून नवी मूल्ये डोक्यात गेली पाहिजेत. संविधान ज्यांच्या हितासाठी बनले आहे, त्यांना ही जाती, धर्माची बंधने सत्तेपासून दूर ठेवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे गुलाम होते त्यांना मालक बनविण्यासाठी संविधानाची निर्मिती केली; परंतु ते ज्यांच्यासाठी बनले आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे का ते पाहणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बौद्धिक महत्ता जगाच्या पाठीवर पटली आहे. त्यांच्या मानवी जीवनाच्या पुनर्रचनेच्या सिद्धांताचा जगातील अनेक देश अभ्यास करीत आहेत. अशा स्थितीत त्यांना आपण जयंती, उत्सव, नामगजर यापलीकडे जाऊन समजून घ्यायला हवे. माणुसकीची उंची वाढविण्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करायला हवा.
साहित्याविषयी डॉ. मनोहर म्हणाले, ‘नव्या पिढीच्या साहित्यिकांनी जात, धर्म यापलीकडे जाऊन साहित्यनिर्मिती करावी. आपल्या डोक्यात सरंजामशाहीचा कैफ भरलेला आहे. तो आपल्याला ना धड माणूस होऊ देतो, ना धड साहित्यिक. देश, धर्म, जात या मर्यादा ओलांडून जो पुढे जातो, तो माणूस होतो. निर्मितीची शक्ती माणसाला निरामय, नितळ माणुसकीच्या पातळीवर घेऊन जाते. लेखक ज्या बिंदूवर साहित्यनिर्मिती करतो, त्याच बिंदूवर वाचक त्याच्याशी एकजीव होतो, असे साहित्य माणसाचे उन्नयन करते.’
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, आई-वडिलांच्याप्रती कृतज्ञ राहणे प्रत्येक पाल्याची जबाबदारी असते. आयुष्याच्या वाटचालीत संस्काराची बीजे रूजविण्यात पालक महत्त्वाचे असतात. ती आपल्या जीवनातील ऊर्जाकेंद्रे असतात. गवळी प्रतिष्ठानचा उपक्रम स्तुत्य आहे. प्राचार्य टी. ए. गवळी यांनी प्रास्ताविक केले.
प्रकाश कुंभार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. प्रसेनजित गवळी यांनी मानपत्राचे वाचन केले. (प्रतिनिधी)
डॉ. मनोहर म्हणाले,जात, धर्म, भाषा यांच्या पल्याड जाऊन नागरिकांमध्ये भातृभाव निर्माण करणे, तो वाढीस लावणे शासनाचे कर्तव्य
संविधान हे धर्मनिरपेक्ष ; त्यास कोणत्याही एका धर्माचे नाव देता कामा नये अन्यथा देशाच्या असंख्य फाळण्या होतील
महाराष्ट्रातील मराठा, ओबीसी अशा जातींच्या मोर्चाला प्रोत्साहन देणारी गुप्त यंत्रणा असावी काय? असा प्रश्न पडायला हवा.