...तरच ‘अंबाबाई’च्या दर्शनाला जाईन-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:37 AM2017-07-25T00:37:58+5:302017-07-25T00:37:58+5:30
सतीश माने-शिंदे : श्रीपूजक हटाओ दिवाणी दावा प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांना हटविण्यासाठी मी अशिलांतर्फे वकीलपत्र घेतले आहे. ही संधी म्हणजे माझ्यासाठी देवीचे बोलावणेच आहे. माझ्या अशिलाच्या बाजूने जर निकाल लागला, तरच ‘अंबाबाई’च्या दर्शनाला जाईन, असे ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. सतीश माने-शिंदे यांनी सोमवारी येथे सांगितले.
करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ’प्रश्नी दिलीप पाटील व दिलीप देसाई यांच्यातर्फे अॅड. सूर्यकांत चौगुले, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. विवेक घाटगे यांनी वकीलपत्र घेतले आहे. त्यात ज्येष्ठ विधिज्ज्ञ म्हणून अॅड. सतीश माने-शिंदे हे काम पाहणार आहेत. या पार्श्वभूमीवर ते कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अॅड. माने-शिंदे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी ज्याप्रमाणे हुकूमनामा केला होता. त्याप्रमाणे अंबाबाई मंदिरात श्रीपूजकांनी कार्य केले नाही. त्यात देवीला टाकलेल्या पैशांमध्ये जर कोणी शंभर रुपये टाकत असेल तर त्यातील केवळ दहा रुपये आपल्यासाठी घेऊन उर्वरित पैसे विश्वस्त किंवा सरकारजमा होणे अपेक्षित होते. तसे न होता आतापर्यंत श्रीपूजकांनी पैसे हडप केले
आहेत. आतापर्यंत दुरूपयोग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी स्वत:हून कृती करायला हवी होती. मात्र, तसे घडलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवाई न करण्यामागे राजकीय दबाव आहे का? त्यात कोण हस्तक्षेप करत आहे हेही पाहिले पाहिजे. सन १९४४ च्या देवस्थान कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार कायद्याने दिले आहेत. मंदिरात लोकांकडून टाकलेल्या दानाचे पैसे कुठे जातात, याची चौकशी करण्याचा
अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांच्या आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया केली ती योग्यच होती.
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक नागरिक जाऊ शकतो. त्यामुळे चौकशीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना नाहीत, असे म्हणता येणार नाही. श्रीपूजकांची नेमणूक ही विश्वस्तांनी केलेली असते. त्यामुळे ही बाब श्रीपूजकांनी विसरून चालणार नाही. या मंदिरातील आतील सर्व देणग्या व दान हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखेखाली येणे गरजेचे आहे. त्यातून पारदर्शकता निर्माण होईल. शेवटी हा पैसा जनतेतून देवीला दान केलेला असतो. त्याचा विनियोग करण्याचे काम शासनाचे आहे. त्यात अन्य लोकांनी हस्तक्षेप करता कामा नये. या प्रकरणात यापूर्वी कोल्हापुरातील ज्येष्ठ विधिज्ज्ञांनी सहभाग घ्यायला हवा होता, असे मतही त्यांनी व्यक्त केले.+
पाटील, देसाई प्रतिवादीसाठी न्यायालयाला विनंती करणार
गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना प्रतिवादी केले आहे. मात्र, यात ‘श्रीपूजक हटाओ’ची मागणी करणाऱ्या संघर्ष समितीमधील पदाधिकाऱ्यांना त्यात प्रतिवादी केलेले नाही. त्यामुळे या दाव्यात दिलीप पाटील, दिलीप देसाई हे स्वत:हून प्रतिवादी होण्यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहेत. त्यात पाटील व देसाई यांच्यातर्फे अॅड. सूर्यकांत चौगुले, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. विवेक घाटगे यांनी वकीलपत्र घेतले असून ज्येष्ठ विधिज्ज्ञ म्हणून सतीश माने-शिंदे या याचिकेसंबंधी भक्तांच्यावतीने काम पाहणार आहेत.
‘व्हीआयपी कल्चर’ इथेही बंद करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उच्चाधिकारी व मंत्रिमहोदयांचे ‘व्हीआयपी कल्चर’ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातून देशातील अनेक मुख्यमंत्री, मंत्री, अनेक उच्च अधिकाऱ्यांनी स्वत:हून आपल्या गाड्यांवरील लाल दिवे लावण्याचे बंद केले आहे. त्याप्रमाणे देव-देवतांच्या दारामध्ये दर्शनासाठी आल्यानंतर देवीला अथवा देवाला भक्त सारखेच असतात. त्यात गरीब-श्रीमंत हा भेदभाव नसतो. त्यामुळे अंबाबाई मंदिरातील ‘व्हीआयपी दर्शन’ही कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाने बंद करावे, असे मतही ज्येष्ठ विधिज्ञ सतीश माने-शिंदे यांनी व्यक्त केले.