...तरच पुढचा फुटबॉल हंगाम सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:57 AM2019-04-05T00:57:52+5:302019-04-05T00:57:56+5:30
कोल्हापूर : चंद्रकांत चषक अंतिम सामना झाल्यावर झालेल्या दगडफेकीनंतर यंदाच्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात पोलीस प्रशासनाने यंदाचा ...
कोल्हापूर : चंद्रकांत चषक अंतिम सामना झाल्यावर झालेल्या दगडफेकीनंतर यंदाच्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यात पोलीस प्रशासनाने यंदाचा हंगाम सोडाच; पुढच्या हंगामात फुटबॉल स्पर्धा भरवावयाच्या असतील तर संयोजकांनी अटी व शर्तींची प्रथम पूर्तता स्पर्धेबाबत विचार केली जाईल, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींसह खेळाडूंना आता आचारसंहिता पाळल्याशिवाय तरणोपाय राहिला नाही.
के. एस. ए.नेही दगडफेकीच्या घटनेबाबत प्रथम मंडळे, फुटबॉल समर्थक यांच्यासाठी आचारसंहिता व्हावी. तिचे पालन, प्रबोधन व्हावे, ही भूमिका घेतली. यासाठी मंगळवारी (दि. ९) के. एस. ए.च्या कार्यालयात फुटबॉल क्षेत्रातील सुमारे ८० हून अधिक आजी-माजी खेळाडू, सोळा संघांचे व्यवस्थापक, पदाधिकारी, आजीवन सभासद, आदींची बैठक बोलाविण्यात येणार आहे. या बैठकीत आदर्श आचारसंहितेवर चर्चा होणार आणि त्यानंतर ती तयार केली जाणार आहे. बहुतांश संघातील खेळाडूंचा सरावालाही मरगळ आल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनानेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा स्पर्धांबाबत कडक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे यंदाच्या फुटबॉल हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; तर पुढच्या फुटबॉल हंगामात अटी-शर्तींची प्रथम पूर्तता केल्यानंतरच स्पर्धेला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस प्रशासनाच्या अटी
पोलीस प्रशासनाने पुढच्या हंगामाकरिता अटी तयार केल्या आहेत. यात प्रत्येक सामन्यात होणारी गर्दी याचा अंदाज संयोजकांनी घेऊन त्याप्रमाणे पोलीस शुल्क भरून बंदोबस्त घ्यावा. यासह प्रेक्षक गॅलरीत पुरेशा प्रमाणात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मैदानात पुरेसा प्रकाश पडेल अशी प्रकाशयोजना केली पाहिजे. पाण्याच्या बाटल्यांऐवजी प्रत्येक प्रेक्षक गॅलरीत पिण्याच्या पाण्याची सोय केली पाहिजे. प्रवेशद्वारावर तिकीट, कोणतीही वस्तू नाही याची खात्री करण्यासाठी चार सुरक्षारक्षक तैनात केले पाहिजेत, आदी अटींचा समावेश आहे.