अवघ्या तीन खोल्यांमध्ये नांदतंय १८ जणांचं कुटुंब
By admin | Published: January 19, 2016 10:42 PM2016-01-19T22:42:52+5:302016-01-19T23:37:23+5:30
आजी-नातवंडं-परतवंडं एकत्रच : परस्परांचा मानसिक आधार दूर-दूर पळवतोय येणारी संकटं--बिग फॅमिली
प्रगती जाधव-पाटील -- सातारा -घरात एखादं कार्य असो, सणवार असो किंवा उन्हाळी कामं. महिलांबरोबरच बच्चे कंपनीचा हातभार लागतोच. घरातली कामे असोत व मुलांची जबाबदारी. सर्वांनीच वाटून घेतल्यामुळे घरातील कोणा एकावर त्याचा ताण येत नाही. अवघ्या तीन खोल्यांमध्ये राहणाऱ्या १८ जणांमध्ये दातृत्वाची प्रवृत्ती सर्वाधिक दिसते.
येथील पंताच्या गोटात जगन्नाथ बाबूराव बाबर आणि जानकी बाबर यांच्या संसाराला सुरुवात झाली. खिंडवाडी गावातील या कुटुंबांची कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथे चांगली शेतजमीन आहे. त्यांना योजना, दिलीप, हरिविजय, सागर, योगीता अशी पाच मुलं. यातील योजना यांचा विवाह बाबर यांच्या बहिणीच्या मुलाशी झाला. त्या मल्हारपेठेत राहतात. तर योगीता विवाहानंतर सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात स्थायिक झाल्या.
जगन्नाथ बाबर यांचा मोठा मुलगा दिलीप पत्नी वसुंधरा यांच्याबरोबर ल्हासुर्णे येथील शेती पाहतात. त्यांची दोन मुलं प्रतीक आणि सिद्धी शिक्षणासाठी साताऱ्यातच राहतात.
बाबर यांचा दुसरा मुलगा हरिविजय पत्नी हर्षल आणि मुलं रिद्धी, प्रथमेश आणि अभिषेक यांच्यासमेवत साताऱ्यात राहतात. ते पवनचक्की देखभालीची कामे पाहतात. त्यांची मुलगी रिद्धी हिचा विवाह राजेवाडी येथील प्रवीण भोसले यांच्याबरोबर झाला आहे. बाळंतपणासाठी ती सध्या माहेरी आहे.
शेंडेफळ असणारे सागर पत्नी सरिता, संदेश व सुदेश या मुलांसह येथेच राहतात. सागर एका खासगी कारखान्यात नोकरीस आहेत.
हजार स्क्वेअर फूट घरातही जिथं मुलांना अभ्यासाला एकांत मिळत नाही, अशी ओरड असते; मात्र तीन खोल्यांत १८ जणांमध्ये राहून बाबर यांच्या नातवंडांनी पदवी संपादन केली आहे. प्रत्येकाला एकमेकाचा आधार वाटत आहे.
घरातील अठरा माणसांबरोबरच येणारे पाहुणे आणि त्यांची सरबराई करण्यातच या घरातील महिलांचा मोठा वेळ जातो. पहाटे साडेपाच वाजता उठलेले हे घर रात्री अकरापर्यंत झोपी जाते.
१७ जणांच्या बाबर कुटुंबीयांना एका महिन्याला एक तेलाचा डबा लागतो. २५ किलो साखर, २५ किलो तांदूळ, ३० किलो गहू, ३० किलो ज्वारी, चार किलो पोहे, ३ किलो रवा, २ किलो गूळ, ४ किलो तूरडाळ, ३ किलो शेंगदाणे, १ किलो शाबुदाणा, दीड किलो चहा पावडर, ५ किलो हरभरा डाळ, ३ सिलिंडर लागतात. अंघोळीचे पाणी बंबात तापविण्यात येते. त्यासाठी ५ मण लाकूड लागते. एका वेळी एक किलोची फळभाजी व ३ पेंड्या पालेभाजी करावी लागते.
संकटांची कधीच काळजी नाही
आपल्या कुटुंबाविषयी बोलताना बाबर म्हणतात, ‘आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे आम्हाला कधीच कोणत्या संकटाची काळजी वाटली नाही. गावात आणि समाजातही आमच्या एकीचे कौतुक केले जाते. हीच परंपरा पुढची पिढीही चालवणार आहे. नातवंडं अंगा, खांद्यावर खेळवून आमच्या आयुष्याचे सार्थक झाले आहे.