कमालच! अवघ्या तीन वर्षाच्या 'अन्वी'ने सर केलं कळसुबाई शिखर, साडेतीन तासांत आईसह मोहीम फत्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 02:32 PM2022-07-05T14:32:56+5:302022-07-05T14:33:19+5:30
अन्वीने आई अनिता सोबत यापुर्वी १८ महिन्यांची असताना पावनखिंड मोहीम फत्ते केली. दोन वर्षांची असताना तिने वेसरफ जंगल १३ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला.
कोल्हापूर : ज्या वयात घरात नीट पाऊल टाकत चालता येत नाही, अशा अवघ्या २ वर्षे ११ महिन्याच्या अन्वी चेतन घाटगे हिने शुक्रवारी (दि. १) रोजी साडेतीन तासांच्या परिश्रमानंतर महाराष्ट्रातील सर्वात उंच समजले जाणारे कळसुबाई शिखर सर केले. ती अशी कामगिरी करणारी देशातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरल्याची माहिती तिची आई अनिता, वडील चेतन घाटगे व प्रशिक्षक कोल्हापूर माऊंटेनिअरिंगचे सचिव सागर पाटील यांनी सोमवारी दिली.
अन्वीने आई अनिता सोबत यापुर्वी १८ महिन्यांची असताना पावनखिंड मोहीम फत्ते केली. दोन वर्षांची असताना तिने वेसरफ जंगल १३ किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला. दोन वर्षे ५ महिन्यांची असताना तिने सादळे मादळे डोंगर सर केला. त्यानंतर अडीच वर्षाची असताना तिने मोरजाई, बोरबेट, पठार चढले. २ वर्षे ८ महिन्यांची असताना तिने शिवगड सर केला. मुळात तिच्या आई अनिता व जिल्हा पोलीस दलात असलेले चेतन घाटगे यांना गिर्यारोहणाची आवड आहे. या आवडीमुळे अन्वीलाही आईसोबत गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली.
याच आवडीतून तिने १ जुलैला आई व वडिलांसोबत एकटीने १,६४६ मीटर उंचीवरील कळसुबाई शिखर सर केले. या मोहिमेदरम्यान तिला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. अनेकदा चढाई करताना पावसामुळे निसरडे झाले होते. दाट धुके, वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस यावर मात करीत तिने हे मोहीम फत्ते केली. या कामगिरीची दखल घेत तेथील बारी ग्रामपंचायत (ता. अकोले, अहमदनगर) ने तिचा सत्कार केला. तिच्या या कामगिरीबद्दल गिर्याराेहण क्षेत्रातून कौतुक होत आहे.