जुलैमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:15 AM2021-07-05T04:15:31+5:302021-07-05T04:15:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : गेली आठ-दहा दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरान, डोंगरमाथ्यावरील ...

The onset of the October heat in July | जुलैमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाका

जुलैमध्ये ऑक्टोबर हीटचा तडाका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : गेली आठ-दहा दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून दिवसेंदिवस पांढरेखड आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. रविवारी कोल्हापूरचा पारा ३२ डिग्रीपर्यंत पोहचल्याने ऐन पावसाळ्यात ऑक्टोबर हीटचा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे.

यंदा माॅन्सूनने वेळेवर हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच सुखावला होता. ‘रोहिणी’चा पेरा अनेक ठिकाणी साधला होता. भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी या पिकांची उगवण चांगली झाली. त्यात ‘मृग’ नक्षत्र दणकून लागल्याने भात, ऊस पिकांची वाढ जोमात झाली होती. चार-पाच दिवसांत धुवाधार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला. जोरदार पावसाने भात, ऊस पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी वाढीला हा पाऊस पोषक राहिला. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला. २१ जून रोजी सूर्याने ‘आर्द्रा’ नक्षत्रात प्रवेश केला आणि पाऊस कमी झाला. या नक्षत्र काळात तीन-चार दिवस पाऊस राहिला मात्र गेली आठ-दहा दिवस पावसाने दडी मारली आहे.

पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी भात, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन या पिकांची आंतरमशागतीचे काम पूर्ण केले आहे. कोळपण, भांगलण केल्याने आता पिकांना पाण्याची ओढ लागली आहे. मशागतीमुळे पिकांची मुळे हलकी झाली आहेत. त्यात उन्हाचा तडाका इतका प्रचंड आहे, की पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिके कोमजू लागली आहेत. आज पाऊस सुरू होईल, उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. मात्र दिवसेंदिवस पांढरेखड आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाविना पिके जगवायची कशी, असा प्रश्न त्याच्यासमोर आहे.

भात रोप लागणी खोळंबल्या

जिल्ह्याच्या पश्चिमेकडे भात व नागलीच्या रोप लागणीला जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होते. भाताचा तरवा लावणीला आला मात्र पाऊस नसल्याने लागण करता येत नाहीत.

आजपासून ‘तरणा’ पाऊस

माॅन्सूनमधील ‘पुनर्वसू’ (तरणा पाऊस’) व ‘पुष्य’(म्हातारा पाऊस) ही दोन नक्षत्रांत जोरदार पाऊस असतो. ‘पुनर्वसू’ नक्षत्र आज, सोमवारपासून सुरू आहेत. वाहन ‘उंदीर’ असून या काळात जेमतेमच पाऊस राहील, असा अंदाज आहे. ‘आर्द्रा’ नक्षत्र कोरडे गेले आहे, ‘पुनर्वसू’ नक्षत्रात तरी पाऊस लागेल का? याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.

तीन-चार दिवस कोरडेच जाणार?

आगामी तीन-चार दिवस वातावरणात फारसा फरक दिसत नाही. त्यामुळे या कालावधीत पावसाची शक्यता धुसर असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

असे राहणार तापमान-

वार किमान कमाल

सोमवार २२ ३१

मंगळवार २१ ३२

बुधवार २३ ३०

फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून पारा चांगलाच वाढला आहे. रविवारी जुलैमध्येच ऑक्टोबर हीटचा तडाका जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे छत्र्या घेऊनच नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे. (फोटो-०४०७२०२१-कोल- रेन, रेन०१, रेन०२, रेन०३) (छाया- नसीर अत्तार

Web Title: The onset of the October heat in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.