अरेरे...! पुरामुळे पावणेतीन कोटींच्या नोटांचा लगदा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:39 AM2021-08-03T11:39:33+5:302021-08-03T11:39:57+5:30
Kolhapur Flood: महापुराच्या पाण्यात शहरासह जिल्ह्यातील ५५ एटीएममधील २ कोटी ७५ लाखांहून अधिक रुपयांच्या नोटा भिजून त्याचा लगदा झाला. लगदा झालेल्या नोटा वाळवून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
- रमेश पाटील
कोल्हापूर : महापुराच्या पाण्यात शहरासह जिल्ह्यातील ५५ एटीएममधील २ कोटी ७५ लाखांहून अधिक रुपयांच्या नोटा भिजून त्याचा लगदा झाला. लगदा झालेल्या नोटा वाळवून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील विविध बँकांच्या २८ शाखा निम्म्याहून अधिक बुडाल्यानेे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात विविध बँकांचे मिळून ६८१ एटीएम आहेत. त्यापैकी ५५ एटीएम पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडाले होते. सतत पाऊस सुरू असल्याने या एटीएममधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले गेले नाहीत. त्यामुळे सरासरी प्रत्येक एटीएममध्ये पाच ते सात लाख रुपयांची रोकड शिल्लक होती. एटीएममध्ये पाणी गेल्याने या सर्व नोटा भिजून त्याचा लगदा झाल्याचे निदर्शनास आले आहे.
आता एटीएममधील नोटांचा ट्रे बाजूला काढून नोटा योग्यरित्या वाळवून त्याचे पुन्हा गठ्ठे करून ते रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याचे काम एटीएममध्ये पैसे भरण्याची सेवा पुरवणाऱ्या एजन्सीने बँकेमार्फत हाती घेतले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे भिजून खराब झालेल्या नोटा रिझर्व्ह बँक बदलून देणार आहे; मात्र नुकसानीचा भुर्दंड काही ठिकाणी एटीएमची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीला तर काही ठिकाणी बँकांना बसणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ एटीएम व विविध बँकांच्या २८ शाखा पुराच्या पाण्यात बुडाल्या असल्या तरी विविध बँकांच्या ट्रेझरीत पुरेशा प्रमाणात कॅश शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये. आपले ज्या बँकेत खाते आहे, ती शाखा पाण्यात बुडाल्याने बंद असेल तर त्या बँकेच्या नजीकच्या शाखेत व्यवहार करावेत.
- राहुल माने, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक, कोल्हापूर