दिवसभर उघडीप, पण कोल्हापूरची रस्ता कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:05+5:302021-07-25T04:21:05+5:30
कोल्हापूर दिवसभर कोल्हापुरात उघडीप मिळाल्याने आणि धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ...
कोल्हापूर दिवसभर कोल्हापुरात उघडीप मिळाल्याने आणि धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी आल्याने पंचगंगेची पूरपातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक फुटाने उतरली. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे; परंतु कोल्हापूरशी संबंधित पाचही प्रमुख रस्त्यांवर पाणी असल्याने कोंडी झाली आहे.
गेल्या दोन दिवसात प्रचंड पावसामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते. एक लाखाहून अधिक जणांना स्थलांतर करावे लागले असून, यातील ४५ हजार जण नातेवाइकांकडे गेलेत तर उर्वरित नागरिकांची प्रशासनाने आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यवस्था केली आहे.
सध्या जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच तुकड्या कार्यरत असून, लष्कराचे ७५ जवान शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांचे स्थलांतर करीत आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी असून, कोकणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा पुणे, बेळगाव आणि कोकणशी असलेला रस्ते संपर्क तुटला आहे. राष्ट्रीय महामार्ग रविवारी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.