बसल्या जागेवरून दरवाजा उघडा, बंद करा
By admin | Published: April 14, 2016 12:03 AM2016-04-14T00:03:57+5:302016-04-14T00:06:13+5:30
रिमोट कंट्रोल दरवाजा : उचगाव येथील अभिषेकने बनविले उपयोगी उपकरण
मोहन सातपुते -- उचगाव --घरात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी पुन्हा-पुन्हा जाग्यावरून उठावे लागते हे टाळण्याचा विचार मनात आला व बसल्या बसल्या दरवाजा उघडण्याची कल्पना सुचली आणि येथील अभिषेक संतोष सुतार (वय १४) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बसल्या ठिकाणाहून दरवाजा उघड-बंद करणारे उपकरण आणि रिमोट तयार केला आहे.
टाकाऊपासून टिकाऊ बनविण्याचा त्यांचा हा छंद कौतुकास्पद आहे. किमान १00 ते २00 फुटांपासून रिमोटचे बटन दाबले की, दरवाजा बंद होतो, तर कोणीही दरवाजा ठोठावला तर रिमोटद्वारे तो उघडताही येतो. अभिषेक भाई माधवराव बागल हायस्कूल येथे नववीत शिक्षण घेत आहे. हुशार असणाऱ्या अभिषेकने शालेय वयातच इलेक्ट्रॉनिक वस्तूची हाताळणी करीत खेळण्यातील कार, फ्रीज बनविला आहे. इलेक्ट्रिक टाकाऊ वायरिंग, सीडी ड्राईव्हचा उघड-झाप करणारा बोर्ड, खेळण्यातील गाडी चालविणारा रिमोंट कंट्रोल या पार्टपासून त्याने हे यंत्र बनविले आहे. सुटीच्या काळात तो सारखे काही ना काहीतरी प्रयोग निर्माण करीत असतो. घराची कडी किंवा बेल कोणी तरी वाजविली की वारंवार उठायला लागते म्हणून मोबाईलच्या बॅटरीचा व विजेचा वापर करीत दाराची कडी बंद करतो व उघडता येण्यासाठी स्वत:च्या कौशल्याचा वापर करीत त्याने हे यंत्र बनविले आहे.
आपल्या दीदीकडून मिळणाऱ्या इन्फॉर्मेशनची व कम्युनिकेशनची त्याला मदत झाली. बंद पडलेल्या खेळण्यातील गाडीच्या रिमोट कंट्रोलचा उपयोग करत त्याने दाराचे यंत्र बनविले आहे. लाईट गेली तर मोबाईल बॅटरीचा वापर करता
येतो. इलेक्ट्रिक वस्तूपासून सीडी ड्राईव्हची वायरिंग वापरली आहे. सीडी ड्राईव्हचा वरील रिकामा प्लेटचा वापर व वायरेल्स कम्युनिकेशनच्या साहाय्याने त्याने अॅन्टिना निर्माण केला आहे. अभिषेकचे वडील एमआयडीसीत कामाला आहेत.