माझी छाती उघडून बघा, ‘धनुष्यबाण’च दिसेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 01:09 AM2019-04-19T01:09:52+5:302019-04-19T01:09:56+5:30
कोल्हापूर : ‘माझी छाती जरी उघडून बघितली तरी तुम्हाला धनुष्यबाणच दिसेल,’ असे सांगत देशाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी नरेंद्र ...
कोल्हापूर : ‘माझी छाती जरी उघडून बघितली तरी तुम्हाला धनुष्यबाणच दिसेल,’ असे सांगत देशाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे आवश्यक असल्याने अन्य कोणताही विचार मनात न आणता प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करण्यासाठी राबणूक करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पाच दिवसांच्या अंतराने कोल्हापुरात आलेल्या पाटील यांनी सकाळपासूनच भेटीगाठींचे सत्र सुरू केले. पंचगंगा कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी गुरुवारी सकाळी पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर मंत्री पाटील सभेसाठी गारगोटीकडे रवाना झाले. दुपारनंतर ते येथील एका हॉटेलवर नियोजित बैठकीसाठी उपस्थित राहिले. गेल्या साडेचार वर्षांमध्ये ज्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांना पाटील यांनी सहकार्याचा हात दिला आहे, अशा संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते.
पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचे दिल्लीत सरकार येण्याची गरज का आहे, याचे विश्लेषण केले.
राहुल चिकोडे यांनी स्वागत केले. महेश जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप देसाई, अभयकुमार साळुंखे, अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, संतोष गायकवाड, हरिभाई पटेल, भावेश पटेल यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यानंतर हातकणंगले तालुक्यातील सभांसाठी पाटील रवाना झाले. शुक्रवारी दिवसभर ते माढा मतदारसंघात थांबणार असून, शनिवारी दिवसभर कोल्हापुरातील मंडल बैठकांना उपस्थित राहून सायंकाळी गडहिंग्लजला होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.