'पीडब्ल्यूडी'चा परिसर फिरण्यासाठी खुला करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:24+5:302021-08-24T04:27:24+5:30
कसबा बावडा : कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आलेल्या ताराबाई पार्क येथील सार्वजनिक बांधकाम ...
कसबा बावडा :
कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आलेल्या ताराबाई पार्क येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात सकाळ व सायंकाळी नागरिकांना फिरण्यास या कार्यालयाने पूर्ववत परवानगी द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोरोना संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे अनेक पर्यटनस्थळे खुली झाली आहेत. मैदानावर खेळण्यास, फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे चित्र एकीकडे असतानाच दुसरीकडे मात्र ताराबाई पार्कातील सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) मात्र हा परिसर नागरिकांना फिरण्यासाठी अद्याप खुला केलेला नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा ताराबाई पार्कातील परिसर खूप मोठा आहे. अंतर्गत ६०० मीटरचा मोठा प्रशस्त रस्ता असल्याने व येथील आवारात खूप मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने येथे स्वच्छ हवा आहे, तसेच वाहनांची येथे वर्दळ नसते. त्यामुळे या ठिकाणी सकाळ व सायंकाळी ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कसबा बावडा, लाईन बाजार, न्यू पॅलेस आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने फिरावयास येतात.
मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे या परिसरात नागरिकांना पूर्णपणे फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी मोठी अडचण येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा परिसर फिरावयास साठी खुला करावा या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत.
फोटो : २३ बावडा पीडब्ल्यूडी'
ताराबाई पार्कातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या याच आवारात नागरिक सकाळ-संध्याकाळी फिरावयास येतात. मात्र, हा परिसर आता फिरण्यासाठी बंद आहे.
( फोटो: रमेश पाटील,कसबा बावडा )