कोल्हापुरात दिवसभर पावसाची उघडीप, पण रस्ता कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 AM2021-07-25T04:20:59+5:302021-07-25T04:20:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने आणि धरणक्षेत्रातही पावसाचा जोर ...

Open rain in Kolhapur all day, but road congestion | कोल्हापुरात दिवसभर पावसाची उघडीप, पण रस्ता कोंडी

कोल्हापुरात दिवसभर पावसाची उघडीप, पण रस्ता कोंडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने आणि धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी आल्याने पंचगंगा नदीची पूरपातळी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक फुटाने उतरली. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे; परंतु कोल्हापूरशी संबंधित पाचही प्रमुख रस्त्यांवर पाणी असल्याने कोंडी झाली आहे.

गेल्या दोन दिवसांत प्रचंड पावसामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते. एक लाखाहून अधिकजणांना स्थलांतर करावे लागले असून यातील ४५ हजार जण नातेवाइकांकडे गेलेत, तर उर्वरित नागरिकांची प्रशासनाने आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यवस्था केली आहे.

सध्या जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच तुकड्या कार्यरत असून लष्कराचे ७५ जवान शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांचे स्थलांतर करत आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथे महापुराचे पाणी असून कोकणाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा पुणे, बेळगाव आणि कोकणशी असलेला रस्ते संपर्क तुटला आहे.

------------------------

पूरस्थिती गंभीरच; शहराचा चाळीस टक्के भाग पाण्यात

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून तुफान कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी शहरात व परिसरात दिवसभर उघडीप दिली. मात्र, महापुराची परिस्थिती मात्र जैसे थे होती. शहरातील चाळीस टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढलेला आहे.

कोल्हापूर शहरातील दुधाळी, उत्तरेश्वर, वाघाची तालीम, मस्कुती तलाव, शुक्रवारपेठ, पंचगंगा तालीम, सिद्धार्थनगर, सीता काॅलनी, सुतारवाडा, रमणमळा, महावीर कॉलेज, कदमवाडी, जाधववाडी, मुक्तसैनिक वसाहत, बापट कॅम्प परिसरात शनिवारी दिवसभर महापुराचे पाणी स्थिर होते. पाण्याची पातळी थोडीसुद्धा उतरलेली नाही. पातळी स्थिर आहे. सुदैवाने शहरात पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. त्यामुळे महापुराची धास्ती थोडी कमी झाली.

--------------------------------------------

सांगलीत कृष्णेची पाणीपातळी ५२ फुटांवर

सांगली : जिल्ह्यातील कृष्णा व वारणाकाठची पूरस्थिती शनिवारी तीव्र झाली असली तरी रविवारी महापुराचा विळखा सुटण्याची शक्यता आहे. धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे.

सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणीपातळी चोवीस तासांत दहा फुटाने वाढली. शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५२ फुटांवर पाणी गेल्याने सांगलीतील टिळक चौक, बायपास रस्त्यावर पाणी येऊन सांगली व इस्लामपूरचा संपर्क तुटला. कोल्हापूर रोडवर पाणी आल्याने सायंकाळी या मार्गावरील वाहतूकही बंद झाली. शहराच्या अनेक भागांमध्ये महापुराचे पाणी शिरल्याने स्थलांतरितांची संख्या वाढली.

जिल्ह्यात शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव व मिरज तालुक्यातील वारणा व कृष्णा नदीकाठची पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. पाटबंधारे विभागाच्या अंदाजानुसार रविवारी सायंकाळपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली येण्याची शक्यता आहे. वारणा नदीचा पूरही ओसरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात शनिवारी बहुतांश तालुक्यात पावसाने पूर्ण उघडीप दिली.

-------------------------------------------------

सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर मंदावला

कोयनेचे दरवाजे साडेेपाच फुटांवर :

सातारा : सातारा जिल्ह्यातील पावसाचा जोर शनिवारी मंदावला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजे साडेपाच फुटांवर आणण्यात आले. धरणातून ३०,२४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत ८७.३७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात बुधवार, गुरुवारी आणि शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे कृष्णा, कोयनेसह सर्वच नद्या दुथडी भरून वाहत होत्या. यामुळे अनेक ठिकाणी शेती, पिके, पूल, रस्त्यांचे नुकसान झाले. अनेक मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्या ठिकाणी दरड काढण्यास सुरुवात झाली आहे, तर दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, दुर्घटना घडलेल्या ठिकाणी प्रशासन पोहोचले असून मदतकार्य सुरू केले आहे.

--------------------------------------------

चिपळूण, खेडमध्ये कोट्यवधींचे नुकसान, पंचनामे सुरू

रत्नागिरी : चिपळूण आणि खेडमधील संपूर्ण बाजारपेठच पुराच्या पाण्यात गेल्यामुळे दोन्ही शहरांमध्ये मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन्ही ठिकाणच्या व्यापाऱ्यांचे कंबरडेच या पुराने मोडून टाकले आहे. असंख्य संसार उघड्यावर आले आहेत. त्याचे पंचनामे करण्याचे काम शनिवारपासूनच हाती घेण्यात आले आहे.

इतिहासात प्रथमच दोन दिवसांत ६०० मि. मी. (सुमारे ४० इंच) पावसाची नोंद चिपळूणमध्ये झाली आहे. इतका मोठा पाऊस आणि त्याचवेळी आलेली भरती यामुळे चिपळूण, खेडमध्ये प्रचंड प्रलयंकारी पूर आला. आजवर २००५ च्या पुराची पाणी पातळी विक्रमी मानली जात होती. मात्र, यावेळी आलेला पूर त्याहीपेक्षा कितीतरी भयानक होता. बाजारपेठेत साठलेल्या पाण्यामुळे छोट्या-मोठ्या अशा सर्वच व्यापाऱ्यांच्या एकूण एक मालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानाचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची भीती आहे.

शुक्रवारी दुपारपासून पाणी ओसरू लागल्यानंतर चिपळूणमध्ये लोक घराबाहेर पडू लागले आहेत. आता घरे, दुकाने, रस्ते जिकडे तिकडे चिखल दिसत आहे. महसूल यंत्रणेने शनिवारी दुपारपासूनच पंचनामे सुरू केले आहेत. यंत्रणा वेगाने कार्यरत व्हाव्यात, यासाठी मंत्री उदय सामंत चिपळूणमध्येच ठाण मांडून बसले आहेत.

--------------------------------------

सिंधुदुर्गात पूर ओसरला तरी चिखलाचे साम्राज्य कायम

जिल्ह्यात पावसाची उसंत : तब्बल दहा दिवसांनंतर झाले सूर्याचे दर्शन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील खारेपाटण, बांदा, कुडाळसह सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरांत, तसेच दुकानांत पाणी घुसले होते. हे पाणी सायंकाळी उशिरापर्यंत ओसरले आहे. मात्र, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काहीजणांच्या घरातील वस्तू नदी पात्रालगत आढळून येत आहेत. दरम्यान, चिखल बाजूला करण्यात अनेकांचा शनिवारचा दिवसही गेला. दुसरीकडे प्रशासन आपल्या पद्धतीने पंचनामे करत असून पंचनामे पूर्ण करण्यासाठी तब्बल आठवडा ते पंधरवडा जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Open rain in Kolhapur all day, but road congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.