कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:01 AM2018-04-09T01:01:06+5:302018-04-09T01:01:06+5:30
कोल्हापूर : गेल्या सात वर्षांपासून खंडित असलेल्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग आता खुला झाला आहे. रविवारी दुपारी मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे ‘एअर डेक्कन’चे चार्टर विमान दाखल झाले. त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. वॉटर शॉवर (पाण्याचे फवारे)ने सलामी देऊन या विमानाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. २० ते २२ एप्रिल दरम्यान विमानसेवेचे रीतसर उद्घाटन होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
बहुप्रतीक्षित कोल्हापूर-मुंबई विमानसेवा केव्हा सुरू होते, याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष होते. यासाठी खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे यांचा दिल्लीदरबारी पाठपुरावा सुरू होता. त्याला यश येऊन या विमानसेवेचा मार्ग खुला झाला आहे. याच्या चाचणीसाठी रविवारी दुपारी तीन वाजता उजळाईवाडीच्या कोल्हापूर विमानतळावर ‘एअर डेक्कन’चे अठरा आसनी चार्टर विमान दाखल झाले. धावपट्टीवर दोन्ही बाजूंना स्वागतास सज्ज असलेल्या अग्निशमन बंबांतून पाण्याच्या फवाऱ्याने सलामी देऊन या विमानाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी विमानातून आलेले भारतीय विमानतळ प्राधिकरणचे सिव्हिल मॅनेजर राजेश अय्यर, फेस्ट आॅफिसर नवीन के., पश्चिम विभागाचे इंजिनिअरिंंग जनरल मॅनेजर एस. के. व्यवहारे, एअर डेक्कनच्या केबिन क्रू उमा पांडे, कॅप्टन अॅँड्री व्ही. यांचे खासदार महाडिक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर विमानतळाच्या व्यवस्थापिका पूजा मूल, कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर सेठ, गोकुळ दूध संघाचे संचालक रामराज कुपेकर, इंद्रजित जाधव, आदी प्रमुख उपस्थित होते.
विमान उड्डाणाची चाचणी यशस्वी होऊन दुपारी चारच्या सुमारास या विमानाने पुन्हा मुंबईकडे उड्डाण केले. आणखी पुढील चार दिवस ही चाचणी सुरू राहणार आहे.
खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूरची विमानसेवा २०११ पासून बंद झाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण कोल्हापूरची विमानसेवा लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या चार वर्षांत आपण पाठपुरावा सुरू ठेवला. त्याचबरोबर केंद्रीय विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे यासाठी प्रयत्न केले. यावर प्रभू यांनी ‘एअर डेक्कन’ला यासंबंधी सूचना दिल्या. त्यानुसार विमान उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. आणखी चार दिवस ही चाचणी सुरू राहून त्यानंतर रीतसर विमानसेवा सुरू होईल. २२ एप्रिलला या विमानसेवेचे रीतसर उद्घाटन होईल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्'ातील खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले जाईल. तसेच केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनाही निमंत्रित केले जाणार आहे.
सहा महिन्यांचे तिकीट भाडे भरतो; पण विमान सुरू ठेवा
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ही सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत होते की नाही, याबद्दल येथील प्रवाशांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे आर्थिक बाबीची चिंता न करता ‘एअर डेक्कन’ने ही सेवा सुरळीत ठेवावी. आवश्यकता वाटल्यास सहा महिन्यांच्या तिकिटांचे भाडे आपण भरू; पण ही सेवा कायम सुरू राहावी, याची हमी आपण विमान प्राधिकरणाला दिली आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.