कागलचे राम मंदिर दर्शनासाठी खुले
By Admin | Published: March 12, 2016 12:53 AM2016-03-12T00:53:17+5:302016-03-12T00:56:24+5:30
कलशारोहण सोहळा उत्साहात : दिवसभर मोठ्या रांगा; भाविकांना महाप्रसाद
कागल : गेली तीन दिवस येथील श्रीराम मंदिरात सुरू असलेल्या उद्घाटन सोहळ््याची शुक्रवारी कलशारोहण, मूर्ती प्रतिष्ठापना या महत्त्वपूर्ण धार्मिक विधीने सांगता झाली. विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती-पूजन, हजारो भाविकांना महाप्रसाद, शहरातील महिलांचे सामुदायिक रामरक्षा पठण, प्रवचन अशा दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमांनी शुक्रवारी या सोहळ््याची सांगता झाली. दुपारी एकच्या सुमारास भाविकांसाठी मंदिर खुले केल्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या.
सकाळी डॉ. श्रीकृष्ण देशमुख, प. पूज्य भूपिन काडसिद्धेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील ब्रम्हवृंदाने पूर्णाहूती विधी, प्राणप्रतिष्ठापना विधी, कलश पूजन विधी केले. श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, श्रीमंत प्रवीणसिंहराजे, आमदार हसन मुश्रीफ, सायरा मुश्रीफ, श्रीमंत नंदितादेवी घाटगे, समरजितसिंह घाटगे, नवोदितादेवी घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, डॉ. स्वप्नील भोसले, तेजस्विनी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कलशपूजन आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला. सामुदायिक महाआरतीनंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दिवसभरात वीरकुमार पाटील, संजयबाबा घाटगे, अखिलेशराजे घाटगे, आ. सतेज पाटील, संजय डी. पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख प्रदीप देशपांडे, अमरसिंह जाधव, ऋतुराज पाटील, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, भाजपचे तालुका अध्यक्ष परशुराम तावरे, देवस्थान समितीच्या संगीता खाडे आदी सहभागी झाले. नगरसेविका नम्रता कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील एक हजार महिलांनी एकत्र येत रामरक्षा पठण केले, तर शाहू हॉलमध्ये दिवसभर महाप्रसादाचे वाटप सुरू होते. व्हाईट आर्मीच्या स्वयंसेवकांसह जीर्णोद्धार समितीच्या शेकडो स्वयंसेवकांनी नियोजनात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. (प्रतिनिधी)
उत्कृष्ट नियोजन
गेली दोन दिवस प्रत्येक कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सुरू आहे. शुक्रवारी शेवटच्या दिवशीही त्याचा प्रत्यंत्तर आला. जवळपास २५ हजार लोकांनी महाप्रसाद घेतला. पण कोठेही गडबड गोंधळ झाला नाही, तर रामरक्षा पठणासाठीही शहरातील महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. अनेकांनी उत्स्फूर्तपणे स्वयंसेवकाचे काम केले. शहरातील मटन विक्रेत्यांनी तीन दिवस मांसविक्री बंद केली होती.
सुहासिनीदेवी घाटगे यांच्या डोळ््यात अश्रू
मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सामुदायिक महाआरती सुरू झाली. धार्मिक विधी करणाऱ्या ब्रम्हवृंदाने हे मंदिर आता दर्शनासाठी खुले झाले आहे, असे जाहीर करताच श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे यांच्या डोळ््यातून अश्रूधारा वाहू लागल्या. उपस्थितीत सर्वांच्या डोळ््यात यावेळी अश्रू दाटले.
कागलमधील प्राचीन राम मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे स्वप्न स्वर्गीय राजेसाहेबांनी खूप वर्षांपूर्वी पाहिले होते. मोठ्या जिद्दीने त्यांनी मंदिर उभारण्याचे काम हाती घेतले. सर्वच लहान-थोर व्यक्तीने आपआपल्या परीने योगदान दिल्याने त्यांची ही स्वप्नपूर्ती आज झाली आहे. एक भव्य दिव्य कार्य उभे राहिले आहे.
- श्रीमंत सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे