उद्यमनगरसह राजारामपुरीतील देखावे पाहण्यास खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 03:26 PM2019-09-09T15:26:37+5:302019-09-09T15:29:04+5:30
संततधार पाऊस आणि महापुराच्या दणक्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आबालवृद्धांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने राजारामपुरीसह उद्यमनगर, आदी ठिकाणी देखाव्यांसह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास खुल्या झाल्या आहेत. पावसानेही उसंत दिल्याने अनेक गणेशभक्तांनी ते पाहण्यासाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.
कोल्हापूर : संततधार पाऊस आणि महापुराच्या दणक्यामुळे यंदा गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही आबालवृद्धांचे मनोरंजन व्हावे, या उद्देशाने राजारामपुरीसह उद्यमनगर, आदी ठिकाणी देखाव्यांसह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यास खुल्या झाल्या आहेत. पावसानेही उसंत दिल्याने अनेक गणेशभक्तांनी ते पाहण्यासाठी काही प्रमाणात गर्दी केली होती.
राजारामपुरी सहावी गल्ली येथील राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने ११ फुटी वीर हनुमानाचा तांत्रिक देखावा साकारला आहे, तर तांत्रिक देखाव्यांची परंपरा लाभलेल्या शिवाजी उद्यमनगर येथील जय शिवराय मित्र मंडळाने यंदा महापुरात उत्कृष्ट कार्य करून अनेकांचे जीव वाचविणाऱ्या एनडीआरएफ जवान असलेला गणेश व देखावा सादर केला आहे.
राजारामपुरी दुसरी गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने यंदा काल्पनिक मंदिर, तर राजारामपुरी स्पोर्टसनेही शिवानंद मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. यासह विवेकानंद मित्र मंडळानेही काल्पनिक मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
शिवाजी चौकातील महागणपती व संयुक्त शिवाजी चौकाचा राजा आणि जुना बुधवार पेठ येथील भगतसिंग तरुण मंडळाचा २१ फुटी गणराया, एस. पी. बॉईजचा चिंतामणी गणराया पाहण्यासाठी खुले झाले आहेत. त्यात पावसानेही उसंत दिल्याने रविवारी सायंकाळी या परिसरात काहीअंशी गर्दी झाली होती. राजारामपुरी, खासबाग, रंकाळा तलाव, चौपाटी, शाहूपुरी, आदी परिसरातील खाऊ गल्लीतही सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.