शिवाजी पूल वाहतुकीस खुला

By admin | Published: August 11, 2016 12:12 AM2016-08-11T00:12:15+5:302016-08-11T00:30:36+5:30

पूर ओसरला : अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर निर्णय; नागरिकांना दिलासा

Open the Shivaji bridge traffic | शिवाजी पूल वाहतुकीस खुला

शिवाजी पूल वाहतुकीस खुला

Next

कोल्हापूर : पुराचे पाणी कमी झाल्याने गेले सहा दिवस बंद असणारा शिवाजी पूल बुधवारी सायंकाळी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याबाबतचे आदेश देण्यात आल्याने दूरच्या अंतराची वाहतूक करून शहरात याव्या लागणाऱ्या ग्रामीण जनतेला दिलासा मिळाला.
पंचगंगा नदीच्या पुरामुळे पाणीपातळी वाढल्याने ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी दक्षता म्हणून शिवाजी पूल गुरुवारी (दि. ४) रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही दक्षता घेतली होती. यामुळे कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद राहिली होती.
मंगळवारी (दि. ९) सकाळपासून पावसाने उसंत दिल्यानंतर पुराचे पाणी ओसरू लागले. त्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केल्याने प्रशासनाने किमान दुचाकी वाहतुकीसाठी पूल खुला केला होता.
बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केल्यानंतर त्यांनी शिवाजी पुलावरून वाहतूक सुरू करण्यास हरकत नसल्याचे पत्र दुपारी जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाकडे दिले. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता हा पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे या पुलावर असणारा पोलिस बंदोबस्त काढण्यात आला. सायंकाळनंतर या पुलावरून अवजडसह सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाल्याने ग्रामीण जनतेने नि:श्वास सोडला.


पुलावर रोज ३० हजार टनांचा भार
शिवाजी पुलाला १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पुलाची लांबी ४३२ फूट आहे. पुलाची उंची ६९ फूट, रोज १० हजार (पी.सी.यू.) अर्थात पॅसेंजर कार युनिट म्हणजेच दहा हजारांहून अधिक वाहनांची ये-जा या मार्गावरून होते.
यात दुचाकींची संख्या लक्षणीय, तर वाळू वाहतूक, बॉक्साईट वाहतूक, मत्स्य वाहतूक, मालवाहतूक, एस. टी. बस, खासगी आरामबस अशा अवजड वाहनांची संख्याही किमान दोन ते तीन हजारांहून अधिक आहे.
यासह चारचाकी, ट्रॅक्टर, जेसीबी, टँकर यांचाही राबता वेगळा आहे. या पुलावरून रोजचा भार सर्वसाधारणपणे ३० हजार टन इतका आहे. १९७८ साली या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे यांनी दिली.


सकाळी पुलाची पाहणी
बुधवारी पुराचे पाणी आणखी खाली गेल्यानंतर सकाळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता आर. के. बामणे, उपअभियंता व्ही. जी. गुळवणी आणि सहायक अभियंता अबदार रावसो या तिघा अधिकाऱ्यांनी संपूर्ण पुलाची पाहणी केली. कोणताही धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर वाहतुकीसाठी पूल खुला करण्यास हरकत नसल्याचे े पत्र जिल्हा प्रशासनास दिले.

Web Title: Open the Shivaji bridge traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.