संतोष ट्राॅफीसाठी उद्यापासून कोल्हापुरात शाहू स्टेडीयमवर धुमशान, महाराष्ट्र-अंदमान निकोबार यांच्यात सलामीची लढत
By सचिन भोसले | Published: October 12, 2023 06:47 PM2023-10-12T18:47:06+5:302023-10-12T19:03:56+5:30
कोल्हापूरच्या पोरांकडे विशेष लक्ष
कोल्हापूर : मानाच्या संतोष ट्राॅफी राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेतील एफ गटातील सहा राज्य संघांचे एकूण १५ सामने कोल्हापूरातील छत्रपती शाहू स्टेडीयमवर आज, शुक्रवारपासून होत आहे. सलामीची लढत यजमान महाराष्ट्र- अंदमान निकोबार या दोन संघात सकाळी ८.३० वाजता होणार आहे.
सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेतील सामने कोल्हापूरच्या या फुटबाॅल पंढरीत होत आहेत. यासाठी के.एस.ए.च्यावतीने अध्यक्ष मालोजीराजे यांचे विशेष प्रयत्न लाभले आहे. आज, शुक्रवारपासून सकाळच्या सत्रात दोन, तर दुपारच्या सत्रात एक असे एकूण तीन सामने एक दिवसाआड होणार आहेत. या एफ गटातून दोन गुणाक्रमे विजेते संघ स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
आज, शुक्रवारपासून होणाऱ्या या स्पर्धेच्या एफ गटातील सामन्यांना सुरुवात होत आहे. महाराष्ट्रासह अंदमान-निकोबार, तेलंगणा, आंध्रप्रदेश, लक्षद्वीप, त्रिपुरा हे संघ कोल्हापूरात दोन दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत. या संघांनी पोलो मैदानावर सरावासही सुरुवात केली आहे. एफ गटातील सामन्यांचे उदघाटन आज, शुक्रवारी सकाळी ८.०० वाजता विफाचे उपाध्यक्ष व एआयएफएफचे सदस्य मालोजीराजे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
कोल्हापूरच्या पोरांकडे विशेष लक्ष
फुटबाॅल पंढरीत होणाऱ्या या स्पर्धेतील सामन्यांमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व कोल्हापूरचा निखील कदम करीत आहे. तर त्याच्यासोबत पवन माळी, संकेत साळोखे, अरबाज पेंढारी, हेही स्थानिक खेळाडू या संघात खेळणार आहेत.चौघांनाही हे मैदान फॅमिलीअर आहे. त्याचा लाभ यजमान संघाला असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. या चौघांची कामगिरीकडे स्थानिक खेळाडूंसह फुटबाॅलप्रेमींचे लक्ष लागून राहीले आहे.
सामने
सकाळी ८.३० वा. महाराष्ट्र - अंदमान निकोबार
सकाळी ११.३० वा. आंध्रप्रदेश- त्रिपूरा
दुपारी ३.३० वा. तेलंगणा- लक्षद्वीप
फोटो : १२१०२०२३ कोल- फुटबाॅल, ०२