कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 06:03 PM2017-08-06T18:03:36+5:302017-08-06T18:05:35+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने रविवारी उघडीप दिली. शहरात काही काळ पावसाच्या हलक्या सरी वगळता खडखडीत ऊन पडले. पावसाची उघडीप असली तरी राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत अंशत: वाढ होऊन सायंकाळी ती १६ फुटांवर पोहोचली.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. शनिवारी (दि. ५) तर पावसाने उघडीप दिली. शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून शनिवारी तो १८०० क्युसेक प्रतिसेकंद करण्यात आला. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत अंशत: वाढ झाली. रविवारी सकाळी आठपर्यंत गेल्या चोवीस तासांत ४२.१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
राधानगरी धरण ९८ टक्के भरले आहे. काळम्मावाडी (दूधगंगा) धरण ८३ टक्के भरले आहे. तसेच वारणा धरण ९१ टक्के भरले असून, येथून १६०६ क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू राहिला. अद्याप पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी, शिंगणापूर व भोगावती नदीवरील खडक-कोगे हे बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यात ४२.१५ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रविवारी सकाळी आठपर्यंत ४२.१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये गगनबावडा तालुक्यात ११.०० मि.मी., राधानगरीमध्ये ३.३३ मि.मी., चंदगडमध्ये ३.०० मि.मी., आजºयामध्ये २.०० मि.मी., कागलमध्ये ०.१४ मि.मी., शाहूवाडीत ११.०० मि.मी., भुदरगडमध्ये ३.०० मि.मी., हातकणंगलेमध्ये २.१२ मि.मी., शिरोळमध्ये निरंक, पन्हाळ्यात ३.८५ मि.मी., करवीरमध्ये २.००, गडहिंग्लजमध्ये ०.७१ मि.मी. पाऊस पडला आहे.