कोल्हापुरातील भूमी अभिलेख कार्यालयात खुलेआम लूट, लाच गोळा करणारे प्रशासकीय रॅकेट कार्यरत
By भीमगोंड देसाई | Published: January 4, 2024 02:00 PM2024-01-04T14:00:42+5:302024-01-04T14:00:52+5:30
भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्हा, शहर, तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना चप्पल तुटेपर्यंत हेलपाटे मारायला लावून त्यांच्या खिशातील ...
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : जिल्हा, शहर, तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना चप्पल तुटेपर्यंत हेलपाटे मारायला लावून त्यांच्या खिशातील पैशावर खुलेआम दरोडा टाकणारे रॅकेट सक्रिय आहे. लिपिक, अधीक्षक ते साहेब अशी लाचेच्या पैशाची वाटणी होत असल्याने तक्रारदाराला कोणाकडेही न्याय मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. शेवटी मागेल त्या पैशात तडजोड करून लाच द्यायची आणि काम करून घ्यायची वेळ त्याच्यावर येत आहे. या व्यवस्थेवर जिल्हा भूमीअभिलेख अधीक्षक सुदाम जाधव, त्यांचे चालक उदय शळके हे १५ हजारांची लाच घेताना नुकतेच सापडल्याने शिक्कामोर्तब झाल्याचा आरोप होत आहे.
भूमी अभिलेख कार्यालयात सीटी सर्व्हे असलेल्या गावातील मालमत्ता पत्रकावर वारसा नोंद करणे, बोजा नोंद करणे, कमी करणे, मालमत्तेची फाळणी करणे, जमीन, प्लॉट मोजणी करणे, हद्द निश्चित करणे, सनद वितरण करणे, जमीन मोजणीसाठीचे पैसे भरून घेणे, प्लॉट, जमीन मोजणे, हद्दीवरून वाद, तक्रारी असतील तर त्याची सुनावणी घेऊन निकाल देणे अशी प्रमुख कामे केली जातात. या कामांसाठी अर्ज देण्यासाठी गेल्यानंतर नसलेल्या कागदपत्राची विचारणा करून हेलपाटे मारायला लावले जाते. त्यातून कमीत कमी एक हजार ते मालमत्ता किमती असेल तर अर्ध्या लाखांपर्यंत लाच घेतली जाते. कोणाचीही भीडभाड न ठेवता कार्यालयात बसूनच लाच गोळा करण्यापर्यंतचे धाडस लाचखोरांचे गेले आहे.
शासकीय शुल्क ऑनलाइन, लाच ऑफलाइन..
मोजणीसाठीचे शुल्क ऑनलाइन भरून घेतले जाते. मात्र लाचेची रक्कम ऑफलाइन घेतली जाते. लाचेची सर्व रक्कम इमानेइतबारे आणून देईल, याचा विश्वास वाटत नसल्याने लिपिक, साहेब स्वत:च़ कार्यालयात आणि आवारात पैसे घेत आहेत. कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर कॅमेरे बंद करून किंवा कॅमेऱ्याची नजर जात नाही, अशा ठिकाणी जाऊन पैसे स्वीकारले जात आहेत. या लुटीत अपवाद वगळता लिपिक ते साहेब सर्वच सहभागी असल्याने तक्रार झाली तर दोषींना शिक्षा होत नसल्याचे चित्र आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का ?
शहर, जिल्हा, तालुका कार्यालय आमदार, खासदारांच्या कार्यक्षेत्रातच येतात. कार्यालयात कोणत्या कामासाठी किती लाच द्यावी लागते, हे जगजाहीर आहे. तरीही अजूनपर्यंत एक आमदार, खासदाराने येथील लुटीच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतलेली नाही. परिणामी लुटीचा हिस्सा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे वरिष्ठांपर्यंत ‘प्रोटोकॉल’च्या माध्यमातून जातो म्हणून भूमी अभिलेखमधील भ्रष्टाचाराला अभय मिळत असल्याचीही सामान्यांची भावना झाली आहे.
सीटी सर्व्हेच्या हद्दीतील वारसा नोंदीसाठीही हलपाटे मारायला लावून लाचेची अपेक्षा ठेवली जाते. जमीन मोजणीसाठी रीतसर पैसे मोजून अर्ज केले तरी वेळेवर मोजणी केली जात नाही. मोजणी केली तरी हद्दीवरून भांडणे लावून त्यातून पैसे उकळले जातात. अशा भ्रष्ट कारभाराविरोधात प्रसंगी आक्रमक होऊन जाब विचारला जाईल. - राजेंद्र गड्ड्यान्नावर, राज्य सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना