विमा नसणाऱ्या वाहनांवर आता कारवाई, परवान्यासह होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:33 AM2019-01-31T11:33:37+5:302019-01-31T11:34:51+5:30
बहुतांशी अपघातग्रस्त वाहनांचा विमा नसल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. त्याचा फटका शारीरिक हानी झालेल्या व्यक्तीला होत आहे. वाहनाची विमा पॉलिसी नसल्याने जखमी किंवा मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई मिळत नाही. शासनाच्या नव्या आदेशानुसार या घटनेची गांभीर्याने दखल आता पोलीस प्रशासनाने घेतली आहे. विमा पॉलिसी नसणारी वाहने रस्त्यावर फिरताना मिळून आल्यास ती जप्त केली जाणार आहेत.
कोल्हापूर : बहुतांशी अपघातग्रस्त वाहनांचा विमा नसल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. त्याचा फटका शारीरिक हानी झालेल्या व्यक्तीला होत आहे. वाहनाची विमा पॉलिसी नसल्याने जखमी किंवा मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई मिळत नाही. शासनाच्या नव्या आदेशानुसार या घटनेची गांभीर्याने दखल आता पोलीस प्रशासनाने घेतली आहे. विमा पॉलिसी नसणारी वाहने रस्त्यावर फिरताना मिळून आल्यास ती जप्त केली जाणार आहेत.
दुचाकी अथवा सर्वच प्रकारच्या वाहनांना विमा पॉलिसी बंधनकारक आहे. वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्यास समोरच्या व्यक्तीला नुकसानभरपाई, थर्ड पार्टी इन्शुरन्स मिळावा, अशी अपेक्षा असते. काही चारचाकी वाहनधारक विमा पॉलिसीची मुदत संपली तरीही वाहने फिरवत असतात. अशा वाहनांचे अपघात झाल्यास संबधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारे नुकसानभरपाई मिळत नाही.
मृत व्यक्तीवर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी असेल, तर खूपच अडचणी येतात. त्यामुळे विमा नसलेली वाहने रस्त्यावर येऊ नयेत. यासाठी शासनाने आता वाहनचालक परवाना, वाहनाची कागदपत्रे, यांसह आता संबंधित वाहनाचा थर्ड पार्टीसह फुल्ल विमा उतरविण्याचे बंधन केले आहे. विम्याची पावती जवळ बाळगणे बंधनकारक आहे.
जे वाहन विमा घेत नाही, ते रस्त्यावर फिरताना आढळल्यास चालकास ३०० रुपये व मालकास दोन हजार रुपये दंड होणार आहे. वेळप्रसंगी वाहन जप्त केले जाणार आहे. त्यामुळे चारचाकी वाहनधारकांनी आपल्या वाहनांचा विमा उतरवून त्याची कागदपत्रेवाहनात ठेवण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी केले आहे.