भेसळखोरांवर कारवाईचे जाळे
By admin | Published: May 26, 2015 12:22 AM2015-05-26T00:22:14+5:302015-05-26T00:49:58+5:30
अन्न-औषधचा धडाका : ४४५ कारवाया; दोन कोटींचा माल जप्त
गणेश शिंदे -कोल्हापूर
गेल्या वर्षभरात भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यात या विभागाने वर्षात केलेल्या ४५५ कारवायांत एक कोटी ८३ लाख ४० हजार ३३ रुपयांचा भेसळ, गुणवत्ताविरहित, हानीकारक असा विविध प्रकारचा मुद्देमालही जप्त केला. या कारवाईची भेसळखोरांनी धास्ती घेतली असली तरी भेसळीचे रॅकेट खूप मोठे असल्याने हा धडाका कायम ठेवावा लागेल.
वर्षभरात या विभागाने जिल्ह्यात गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू, मावा आदी ५६ प्रकरणांमधून एक कोटी ५७ लाख तीन हजार ४७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इतर अन्नपदार्थांच्या २२ प्रकरणांत २६ लाख ३६ हजार ५५६ रुपये असा एकूण एक कोटी ८३ लाख ४० हजार ३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दुसरीकडे, अन्न नमुन्याच्या ३६७ प्रकरणांत चार लाख आठ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये ३० नमुने हे खाद्यपदार्थांशी संबंधित होते. ३५ नमुने हे कमी दर्जाच्या खाद्यपदार्थांशी संबंधित होते, तर नऊ नमुने हे खाद्यपदार्थांच्या पॅकेजवर खोट्या जाहिराती करणारे होते. १२ प्रकरणात ज्यांची उलाढाल साडेबारा लाख रुपयांपर्यंत आहे अशांकडून एक लाख ५७ हजार ५०० रुपये दंड तर साडेबारा लाखांवर उलाढाल असणाऱ्या ३५ प्रकरणांमधून एक लाख ५१ हजार ५०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. ज्यांची उलाढाल साडेबारा लाख रुपये होती त्यांच्यावर पुण्यातील कार्यालयामध्ये अन्न सुरक्षा मानके ७४ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुळासाठी जनजागृती
कोल्हापूरचा गूळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्याच्या उद्देशाने गूळ उत्पादक, गुऱ्हाळघरे, शेतकरी व शेतकरी संघटनांबरोबर सप्टेंबर महिन्यापासून प्रत्येक तालुकानिहाय प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम घेणार आहे. त्यानंतरही गुळात कृत्रिम रंग मिसळून त्याची विक्री करणाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी प्रशासन कडक कारवाईची पावले उचलणार आहे.
राज्यात कोल्हापूर जिल्हा कारवाईमध्ये अग्रेसर आहे. ग्राहकांना स्वच्छ, उत्तम प्रतीचा व दर्जाचा गूळ मिळावा यासाठी आता गूळ उत्पादक व शेतकऱ्यांचा जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, पण कृत्रिम गुळाची विक्री करत असेल तर कारवाईचा बडगा उगारला जाईल.
- संपत देशमुख, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध
प्रशासन विभाग, कोल्हापूर.
कोल्हापूर विभागावर प्रकाशझोत...
तीन सहाय्यक आयुक्त
(दोन अन्न व एक औषधासाठी)
पाच अन्न सुरक्षा अधिकारी
तीन कर्मचारी
असुरक्षित दर्जाचे शीतपेय विक्री केल्याप्रकरणी एकावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हा खटला न्यायालयात आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधिताला सहा महिने सक्तमजुरी व एक लाख रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.
...तरच तस्करीला आळा
परराज्यांतून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे विक्री होत असल्याचे यापूर्वी झालेल्या कारवाईमधून उघड झाले आहे. त्यामुळे या विभागाला कारवाई करण्यास अडचणी येतात. त्यासाठी सांगली, सोलापूर व कोल्हापूर या सीमामार्गावर अन्न व औषध विभागाने तपासणी नाका केला तरच अशा तस्करीला आळा बसेल.
जप्त अन्नपदार्थ
रंगवलेला चहा - १६ लाख ६३ हजार ७१९ रुपये
रंगवलेला फरसाणा - ५ लाख ५० हजार ६८० रुपये
कमी दर्जाचे पनीर
- ७ हजार ८४० रुपये
मित्ता छाप - ७० हजार ९९२ रुपये
मिनरल वॉटर - १ लाख ७० हजार ८७९ रुपये
खवा - ५६ हजार ५५० रुपये
बनावट खाद्यतेल - १ लाख १४ हजार ८९८ रुपये