‘आॅपरेशन थिएटर’ आता थेट गोठ्यात

By admin | Published: January 6, 2015 12:36 AM2015-01-06T00:36:24+5:302015-01-06T00:50:13+5:30

‘गोकुळ’चे पुढचे पाऊल : वासरू संगोपन अनुदानात वाढ ; कृषी योजनेतून डेअरीचे विस्तारीकरण

'Operation Theater' now live in the manger | ‘आॅपरेशन थिएटर’ आता थेट गोठ्यात

‘आॅपरेशन थिएटर’ आता थेट गोठ्यात

Next

राजाराम लोंढे = कोल्हापूर -‘गोकुळ’च्या दूधवाढीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व राज्यभरातील दूध संघांना आदर्शवत असणाऱ्या वासरू संगोपन योजनेच्या अनुदानात नवीन वर्षांत वाढ करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) घेतला आहे. राष्ट्रीय कृषी योजनेतून डेअरीचे विस्तारीकरण करण्यात येणार असून आजारी जनावरांसाठी ‘आॅपरेशन थिएटर’ थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यात पोहोचविण्याचा निर्णयही संघाने घेतला आहे.
‘गोकुळ’च्या स्थापनेवेळी दिवसाचे सरासरी दूध संकलन १८ हजार लिटर होते. गेल्या ५२ वर्षांत ते सात लाख लिटरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दहा वर्षांत दूध संघाने अनेक विक्रम पादाक्रांत करत दूध संकलनवाढीबरोबर मार्केटिंग व्यवस्थेत मुंबई, पुण्यासारख्या बाजारपेठेत प्रस्थापित संघांना रोखत आपला दबदबा कायम राखला आहे. गेल्या दहा वर्षांची तुलना करायची म्हटली तर संघाच्या दूध संकलनात दिवसाला सरासरी अडीच लाख लिटरने वाढ झाली आहे. त्यात संघ व्यवस्थापनाचे निर्णय कारणीभूत आहेत. भविष्यातील दुधाची गरज ओळखून व्यवस्थापनाने वासरू संगोपन योजना सुरू करून जातीवंत म्हैस व गायी गोठ्यातच वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात यश येत आहे, संघाच्या संकलनवाढीत मोठा वाटा हा या योजनेचा आहे. योजनेच्या अनुदानात भरघोस वाढ करण्याचा विचार संचालक मंडळ करीत आहेत. राष्ट्रीय कृषी योजनेतून संघाला ४८ कोटी रुपये मिळणार आहेत, त्यामधून मुख्य प्रकल्पासह शीतकरण केंद्राचे विस्तारीकरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
दिवसेंदिवस गोकुळ संघाच्या दुधाला मागणी वाढत आहे, परिणामी मुंबई स्टेशनवर मर्यादा येत असल्याने ठाणे व कल्याण येथे पॅकिंग स्टेशन उभी करण्यात येणार आहेत. लोकसंख्येप्रमाणे जनावरांचीही संख्या वाढत आहे, पण त्यांच्या वैद्यकीय सेवेबाबत फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. ‘गोकुळ’ पशुवैद्यकीय सेवा गोठ्यापर्यंत देते,पण एखाद्या दुर्दम्य आजारामुळे जनावराचे आॅपरेशन करायचे तर शहराच्या ठिकाणी जनावरांना आणावे लागते. यासाठी संघ फिरते आॅपरेशन थिएटर सुरू करणार आहे. ‘एक्स रे’ युनिट सर्वच केंद्रांवर सुरू करण्यात येणार आहे.


११ लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट
सरत्या वर्षात ‘गोकुळ’ने दहा लाख लिटर संकलनाचा टप्पा पार केला. यावर्षी प्रतिदिन अकरा लाख लिटर दूध संकलन करण्याच्या दृष्टीने गोकुळ दूधसंघाने नियोजन केले आहे.


दुधाच्या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे, संकलनवाढीबरोबर दूधाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच विविध योजना राबविल्या जात आहेत. आगामी वर्षांत उत्पादकांच्या हिताचे अनेक निर्णय गोकुळ दूध संघ घेणार आहे.
- दिलीप पाटील,
अध्यक्ष, गोकुळ दूध संघ

Web Title: 'Operation Theater' now live in the manger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.