आजरा कारखाना बिनविरोधला नेत्यांचा विरोधच
By admin | Published: March 28, 2016 11:35 PM2016-03-28T23:35:21+5:302016-03-29T00:18:20+5:30
गोंधळाचे वातावरण : आघाड्या बांधणीवरच ठरणार निवडणुकीतील यशापयश
ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा साखर कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा काही मंडळी व्यक्त करीत असली तरी प्रमुख नेतेमंडळींचाच बिनविरोधला विरोध असल्याने आता आघाड्यांच्या बांधणीवरच निवडणुकीतील यशापयश ठरणार, हे स्पष्ट होत आहे.
गडहिंग्लज साखर कारखान्याची रणधुमाळी आता शांत झाली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह नेतेमंडळींचे लक्ष आजरा साखर कारखान्याकडे केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँगे्रस हे एकत्र राहणार हे स्पष्टच आहे, तर प्रबळ विरोधक म्हणून अशोक चराटी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना-भाजप असे चित्र पहिल्या टप्प्यात दिसत आहे. कदाचित यामध्ये बदलही होऊ शकतो.
अशोक चराटी, जयवंतराव शिंपी, श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांचे चाचपणी मेळावे पार पडले. यामध्ये केवळ अंजनातार्इंनी बिनविरोधबाबत भाष्य केले, तर अशोकअण्णा यांच्या मेळाव्यात बिनविरोध नकोच, चांगल्या कार्यकर्त्यांना त्यामुळे संधी मिळत नाही, अशी उघड भूमिका जिल्हा दूध संघाचे संचालक रवींद्र आपटे यांनी घेऊन बिनविरोधचा ‘चराटी’ यांच्या गटाकडून मुद्दा निकालात काढला आहे.
सत्तारूढ मंडळींमध्ये आता एकंदर परिस्थिती पाहिली तर मनोमिलन होणे अशक्य आहे. याशिवाय जिल्हा बँक, जनता बँक, तालुका खरेदी-विक्री संघ निवडणुकीतही अनेकांना ‘कारखान्याचे’ गाजर दाखवून त्या-त्यावेळी शांत केले आहे. अशी मंडळीही बिनविरोध हा प्रकार बाजूला ठेवण्याच्या सूचना नेत्यांना करू लागली आहेत. बिनविरोधच्या नादात कार्यकर्ते दुखावण्याचा धोकाही समोर आहे.
कारखाना निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असली तरी ती विरोधकांना बंधनकारक निश्चितच असणार नाही. सध्या असणाऱ्या गटामध्ये जयवंतराव शिंपी, भाजप, श्रमिक मुक्ती दल यांनाही बऱ्यापैकी प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे.
सगळेच गोंधळाचे वातावरण असल्याने बिनविरोधी केवळ
चर्चाच राहील आणि उमेदवारांची संख्या मात्र विक्रमी असेल, असेच दिसत आहे.